अनिल देशमुखांनी ‘ईडी’ च्या समोर जाण्याचा मुहूर्त सचिन वाझे ताब्यात आल्यावरच का काढला?


मुंबई – काल रात्री उशीरापर्यंत राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना १०० कोटींच्या वसुली प्रकरणात चौकशी करुन मध्यरात्री अखेर अटक करण्यात आली. ईडीकडून करण्यात आलेल्या या कारवाईनंतर आता भाजप नेत्यांकडून जोरदार निशाणा साधला जात आहे. अनिल देशमुख यांच्यावर भाजप नेते व राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देखील निशाणा साधला असून, महाराष्ट्र पोलीस आणि एसआईटीच्या सचिन वाझे हे ताब्यात आल्यावरच अनिल देशमुखांनी ईडीच्या समोर जाण्याचा मुहूर्त का काढला..? असा सवाल त्यांनी केला आहे.

याबाबत एक व्हिडिओ ट्विटरवर सुधीर मुनगंटीवार यांनी शेअर केला असून त्यामध्ये म्हटले आहे की, खरे आहे देर आए दुरूस्त आए…ईडीच्या कार्यालयात आहात. एक गृहमंत्री म्हणून ज्यांनी जबाबदारीचा निर्वाह केला, त्यांनी एक आदर्श प्रस्थापित करायला हवा होता. नेहमी पोलीस अधिकाऱ्यांसोबत किंवा जनतेसोबत संवाद साधताना अनिल देशमुख सांगायचे, की पोलिसांनी एखादा खोटा गुन्हा दाखल केला, तर त्या संदर्भात आपली बाजू मांडलीच पाहिजे. कायद्या तुमच्या बाजूने उभा आहे. मग जे वाक्य अनिल देशमुख दुसऱ्यांना सांगायचे, आज असे अचानक काय झाले? त्याची दोनच कारणे असू शकतात. एक कारण, की अनिल देशमुख यांच्या हे लक्षात आले की न्यायालयातून देखील आपल्याला या संदर्भात अटकपूर्व जामीन मिळू शकत नाही. दुसरा मुद्दा यामध्ये संपत्ती जी आहे, त्या संपत्तीवर टाच येत आहे.


तसेच, तिसरा एक महत्वाचा मुद्दा आहे. ज्या मुद्द्यासंदर्भात मी लक्ष वेधू इच्छितो की सचिन वाझे आता महाराष्ट्राच्या एसआयटीच्या सुपूर्द झाला आहे. अनिल देशमुखांना कदाचित असे वाटत असेल, आता सचिन वाझे आपण सांगू त्या पद्धतीने एसआयटी त्याच्याकडून वदवून घेईल आणि म्हणून आता मी जर ईडीच्या समोर गेलो, तर आता धोका नाही. हे असण्याची शक्यता आहे. मी असे म्हणणार नाही हेच आहे, पण असे असण्याची देखील शक्यता आहे. असा मुहूर्त का काढला? सचिन वाझे महाराष्ट्र पोलीस व एसआयटीच्या ताब्यात आल्याबरोबर अनिल देशमुख हे ईडीच्या समोर आले. एवढे दिवस कुठे होते? याचे उत्तर शेवटी अनिल देशमुख यांनी दिले पाहिजे, असं देखील मुनगंटीवार यांनी बोलून दाखवले. त्याचबरोबर, माझ्या या प्रमुख दोन शंका आहे. एक त्यांच्या हे लक्षात आले की आपली ही अटक आता थांबवता येत नाही. दुसरे ही योग्य संधी आहे. सचिन वाझे आता महाराष्ट्र पोलिसांच्या ताब्यात असल्याचेही मुनगंटीवार शेवटी म्हणाले आहेत.