आमच्या कुटुंबावर, घरांवर, नेत्यांसोबत खेळ तुम्ही सुरु केला आहे, त्याचा शेवट आम्हीच करणार ; संजय राऊत


मुंबई – देशात तीन लोकसभा आणि २९ विधानसभेच्या जागांवर झालेल्या पोटनिवडणुकांचे समोर येत आहेत. यामध्ये शिवसेना ही दादरा नगर हवेली येथे आघाडीवर आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या विजयाच्या उंबरठ्यावर असताना हा निकाल ऐतिहासिक असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर आमच्या कुटुंबावर, घरांवर, नेत्यांसोबत खेळ तुम्ही सुरु केला आहे, त्याचा शेवट आम्हीच करणार असा इशारा संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे.

शिवसेना दादरा नगर हवेलीमध्ये महाराष्ट्राबाहेर पहिली जागा जिंकण्याचे काम करत आहे. महाराष्ट्राच्या बाहेर आणि गुजरातच्या सीमेजवळ असणारा हा निकाल ऐतिहासिक असणार आहे. तिथूनच देशाच्या राजकारणाचा दरवाजा उघडतो. देगलूरला सुद्धा महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत ते जिंकणार असल्याचे टीव्ही ९सोबत बोलताना संजय राऊत यांनी म्हटले आहे.

हे निकाल असे सांगत आहे की २०२४ साली केंद्रामध्ये परिवर्तन होणार आहे. त्यावेळी जे नाचे आज नाचत आहेत महाराष्ट्रात त्यांच्या पायामध्ये कोणते घुंगरू बांधायाचे आणि त्यांना कसे नाचवायचे हे, आम्ही ठरवणार. हे संजय राऊत सांगत आहेत, ते लिहून ठेवायचे. आमच्या कुटुंबावर, घरांवर, नेत्यांसोबत खेळ तुम्ही सुरु केला आहे त्याचा शेवट आम्हीच करणार, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

अनिल देशमुख यांच्यानंतर अनिल परब यांचा नंबर आहे असे भाजपचे नेते सोशल मीडियावर म्हणत असल्याचे पत्रकाराने विचारले. त्यावर संजय राऊतांनी उत्तर दिले आहे. केंद्रीय तपास यंत्रणा तुमच्या बापाच्या आहेत का? तुम्ही कधी तुरुंगात जाणार आहात त्या तारखा आम्ही सांगू. पण या पातळीवर आम्ही नाही उतरणार. हे बोंबलणारे भाजपचे मूळ लोक नाहीत. देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार यांना आम्ही उत्तरे देऊ. हे हवसे नवसे गवसे नाचे बाहेरुन आले आहे आणि भाजपचा झेंडा फडकवून आम्हाला दाखवत आहेत. भाजपसोबत आमचा संबंध जुना होता आणि आहे. तुम्ही भाजपविषयी बोलू नका. आम्हाला भाजप, संघ परिवार काय आहे हे माहिती असल्याचे संजय राऊत म्हणाले.