विराट कोहलीच्या मुलीला धमक्या देणाऱ्यांच्या विरोधात दिल्ली महिला आयोगाने उचलले ‘हे’ पाऊल!


नवी दिल्ली – भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीवर टी-२० विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर ट्रोलर्सनी निशाणा साधला. त्याचबरोबर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याच्या कुटुंबालाही आता धमक्या मिळाल्या आहेत. ट्विटरवरील एका अज्ञात अकाऊंटवरून विराटच्या १० महिन्याच्या मुलीलाही धमक्या आल्या आहेत. हे ट्विट कोणी केले, हे अद्याप समजू शकलेले नाही. हे अकाउंट सध्या डिलीट करण्यात आले आहे. विराट कोहली आणि त्याच्या कुटुंबासाठी केलेल्या आक्षेपार्ह ट्विटनंतर सोशल मीडियावर लोक विराटच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया देत आहेत.

दिल्ली महिला आयोगाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. पोलिसांना दिल्ली महिला आयोगाने नोटीस पाठवली असून अध्यक्ष स्वाती मालीवाल यांनी ही घटना अत्यंत लज्जास्पद असल्याचे म्हटले आहे. स्वाती मालीवाल यांनी पोलिसांना नोटीस देताना आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे.

काही धर्मांधांनी पाकिस्तानविरुद्धच्या दारुण पराभव जिव्हारी लागल्यानंतर सोशल मीडियावरून मोहम्मद शमीला लक्ष्य केले. पण, भारताच्या या गुणी गोलंदाजाची भारताच्या अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी, तसेच सर्वसामान्य क्रिकेट रसिकांनीही एकदिलाने पाठराखण केली. विराट कोहलीनेही शमीला पूर्णपणे पाठिंबा दिला. लक्ष्य करणाऱ्या धर्मांधांना विराटने खडसावले आणि एखाद्या व्यक्तीला त्याच्या धर्मामुळे लक्ष्य करणे अतिशय निंदनीय असल्याचे मत दिले. विराटच्या या वक्तव्यानंतर काही विकृतांनी असभ्यपणे त्याच्या दहा-वर्षाच्या मुलीला लक्ष्य केले.

सोशल मीडियावर या विकृतांनी विराटवर राग व्यक्त करताना त्याच्या दहा महिन्यांच्या मुलीलाही सोडले नाही. सोशल मीडियावर अनेकांनी विराटच्या मुलीवर अर्वाच्य भाषेत व्यक्त झाले. या दरम्यान सोशल मीडियावर व्यक्त होताना पातळी कशी सोडली जाते, हे या ट्रोलर्सकडून पाहायला मिळाले. असंवेदनशील टिप्पण्या आणि शिवीगाळ याचा परमोच्च बिंदू गाठल्यानंतर काहींनी या ट्रोलर्सला चांगलेच धारेवर धरले आहे.