कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केली आपल्या नव्या पक्षाची घोषणा; हे असेल नाव


अमृत्तसर – पंजाब काँग्रेसमधील वाद गेल्या काही महिन्यांपासून चव्हाट्यावर आले होते. आधी नवज्योत सिंग सिद्धू यांच्याशी सुरू असलेले वाद, त्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दिलेला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, चरणजीतसिंग चन्नी मुख्यमंत्री झाल्यानंतर नवजोतसिंग सिद्धू यांचे नाराजीनाट्य या सगळ्या घडामोडींनंतर आता त्या वादावर अखेर पूर्णविराम लागला आहे. अखेर काँग्रेसच्या सदस्यपदाचा देखील कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिला आहे. यासोबतच, त्यांनी आपल्या नव्या पक्षाच्या नावाची देखील घोषणा केली आहे. त्यांनी राजीनामा सादर करताना पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना तब्बल ७ पानांचे पत्रच लिहिले असून पक्षात आल्यापासून काँग्रेससाठी दिलेल्या योगदानाचा संपूर्ण इतिहासच त्यांनी या पत्रात मांडला आहे.

पक्षाध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आपल्या मनातील व्यथा पुन्हा एकदा बोलून दाखवली आहे. मी अनेकदा विरोध करूनही आणि पंजाबमधील पक्षाच्या सर्व खासदारांच्या एकत्रित सल्ल्यानंतरदेखील तुम्ही अशा व्यक्तीला पंजाब काँग्रेसचे प्रमुख बनवले, ज्यांनी जाहीररीत्या पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल बाजवा आणि पंतप्रधान इम्रान खान यांची गळाभेट घेतली होती. नवज्योतसिंग सिद्धू यांना तुम्ही निवडले. बाजवा आणि इम्रान खान हे सीमेपलीकडून देशात दहशतवादी पाठवण्यासाठी कारणीभूत आहेत. भारतीयांना मारण्यासाठी कारणीभूत असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

अमरिंदर सिंग यांनी नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर निशाणा साधतानाच गांधी कुटुंबावर देखील नाराजी व्यक्त केली. तुमच्या आणि तुमच्या मुलाच्या वर्तनामुळे मी खूप खोलवर दुखावलो गेलो आहे. मी जेवढे प्रेम माझ्या मुलांवर करतो, तेवढेच प्रेम मी त्यांच्यावर देखील करतो. मी त्यांच्या वडिलांना १९५४ सालापासून ओळखत होतो. आम्ही शाळेत एकत्र होतो. त्या गोष्टीला आता जवळपास ६७ वर्ष लोटली असल्याचे अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाठवलेल्या पत्रात म्हटल आहे.

मी काँग्रेसचा राजीनामा माझे राज्य आणि माझ्या देशाच्या हितासाठी सादर करत असल्याचे देखील अमरिंदर सिंग यांनी नमूद केले आहे. राजीनामा दिल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आपल्या नव्या पक्षाच्या नावाची देखील घोषणा केली. आपल्या नव्या पक्षाचे नाव ‘पंजाब लोक काँग्रेस’ असेल, असे त्यांनी जाहीर केले आहे.