तुमच्या कॅबिनेटमध्ये असलेल्या लहान मुलाला विचारा, की तू बाबा फोर सिझनमध्ये काय करायचा? – नितेश राणे


मुंबई – मुंबईतील फोर सिझन हॉटेलमध्ये ड्रग्ज पार्ट्या होत असल्याचा संशय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केला होता. त्यानंतर या प्रकरणामध्ये आता भाजपचे नेते नितेश राणे यांनी नवाब मलिक यांना उत्तर दिले आहे. नितेश राणे यांनी हे उत्तर देताना या ड्रग्ज प्रकरणावरील प्रश्नावरुन थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. नितेश राणेंनी मुंबईमधील पत्रकार परिषदेमध्ये राज्याच्या पर्यावरण मंत्र्यांना फोर सिझनमधील पार्ट्यांबद्दल माहिती आहे. नवाब मलिकांनी त्यांच्याकडून माहिती घ्यावी, असे म्हटले आहे.

रोज नवाब मलिक आणि संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घ्यावी. जेवढे ते बोलत आहेत ते तेवढी महाविकास आघाडीची कब्र खोदत चालले आहेत. आम्हाला याचे निश्चित समाधान आहे. तुम्हाला फोर सिझनमधील पार्ट्यांची माहिती हवी असेल, तर तुम्ही त्यांच्या पर्यावरण मंत्र्यांना विचारा. फोर सिझनमध्ये पार्ट्या कशा व्हायच्या कोणाबरोबर व्हायच्या याची माहिती मंत्रीमंडळातील पर्यावरण मंत्र्यांकडे चांगल्या पद्धतीने असल्याचे नितेश राणे म्हणाले आहेत.

नितेश राणे यांनी पुढे बोलताना आदित्य ठाकरेंचा उल्लेख ‘लहान मुलगा’ असा केला आहे. आजूबाजूला विचारण्यापेक्षा नवाब मलिकांनी कॅबिनेटमध्ये तुमच्या बाजूला बसलेल्या लहान मुलाला विचारले की तू बाबा फोर सिझनमध्ये काय करायचा? तर तो आमच्यापेक्षा जास्त माहिती देऊ शकतो, असं नितेश राणे म्हणाले आहेत. फोर सिझनमध्ये ते यायचे. त्यांना चांगली माहिती असेल. मग त्यांनी ती नवाब मलिकांना द्यायला पाहिजे ना की काय चालले आहे फोर सिझनमध्ये ते. फार लांब जायची गरज नसल्याचे टोलाही नितेश यांनी लगावला आहे.

तसेच फोर सिझनमधील सीसीटीव्ही फूटेज नवाब मलिक हे दाखवणार असल्याच्या मुद्द्यावरुन प्रश्न विचारण्यात आला असता नितेश राणेंनी आपणही सीसीटीव्ही फूटेज द्यायला तयार असल्याचे म्हटले आहे. नवाब मलिकांनी एक सीसीटीव्ही फूटेज दाखवावे, मग मी पण दुसरे सीसीटीव्ही फुटेज देतो. कोण कुठे बसायचे आणि कोण कुठल्या टेबलवर असायचे. डिनोबरोबर मांडीला मांडी लावून कोण बसायचे ही माहिती मी पण देऊ शकतो. नवाब मलिकांना माहिती हवी असेल तर देतो. अजून खोदायचे असेल महाविकास आघाडीला अजून खाली टाकायचे असेल तर महिती द्यायला मी तयार असल्याचे नितेश राणे म्हणाले.