विरोधकांवर टीका करताना अमृता फडणवीसांची जीभ घसरली


मुंबई – राष्ट्रीय अमली पदार्थविरोधी विभाग (एनसीबी) विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावरून काम करीत असून फडणवीस यांचे निकटवर्तीय कार्यालयात वावरत असल्याचा आरोप करीत अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी अमृता फडणवीस यांचे ड्रग्ज माफियाबरोबरचे फोटो समाजमाध्यमांवर सोमवारी शेअर केले. त्यावर एका गाण्याच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळी संबंधित संस्थेच्या व्यक्तींबरोबर आलेल्या काही जणांनी आम्हा दोघांबरोबर छायाचित्रे काढून घेतली होती. उलट मलिक यांचे गुन्हेगारी जगताशी संबंध असून त्याबाबतचे पुरावे दिवाळीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आणि प्रसिद्धीमाध्यमांना देणार असल्याचे प्रत्युत्तर फडणवीस यांनी दिले. यानंतर फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावत नवाब मलिक आणि सत्ताधाऱ्यांवर टीका केली. पण यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना अमृता यांची जीभ घसरल्याचे पहायला मिळाले. सध्या त्यांच्या या वक्तव्याची फार चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.

एका पत्रकाराने नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांवरुन प्रश्न विचारताना जाणीवपूर्वक आरोप केले जात आहेत का असे नवाब मलिक यांचे नाव घेत प्रश्नामध्ये विचारले. अमृता यांनी त्यावेळी बोलताना, नक्कीच जाणीवपूर्वक केले जात आहेत. आमच्याकडे काहीच नाही आहे, जे ते एक्सपोज करु शकतात. आमच्याकडे ना लॅण्ड बँक आहेत, ना साखर कारखाने आहेत. त्यामुळे नॅचरली ते (विरोधक) आमच्यावर च***. आम्ही कोणाला घाबरत नाही तर च****,” असे उत्तर दिले. टीका करताना या शब्दाऐवजी अमृता यांनी प्रमाण भाषेत नसणारा खालच्या पातळीवरील शब्द पत्रकार परिषदेमध्ये वापरल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.