मुस्लिमांबद्दल द्वेषपूर्ण वक्तव्य केल्याप्रकरणी भाजप नेत्याविरोधात गुन्हा दाखल


श्रीनगर – भाजप नेत्याविरोधात जम्मू आणि काश्मीरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार विक्रम रंधावा यांच्याविरोधात काश्मिरी मुस्लिमांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. बहू फोर्ट पोलीस ठाण्यात वकील मुझफ्फर अली शाह यांनी लेखी तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विक्रम रंधावा यांनी मुस्लिमांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडेने दिले त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, टी-२० विश्वचषक सामन्यात पाकिस्तानच्या संघाने भारतावर विजय मिळवल्यानंतर काश्मीरच्या अनेक भागांमध्ये जल्लोष साजरा करण्यात आला होता. या घटनांवर विक्रम रंधावांनी टिप्पणी केली होती. रंधावा यांच्या विरोधात जाणीवपूर्वक धार्मिक भावना दुखावण्याच्या हेतूने वक्तव्य केल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, रंधावा यांना जम्मू-काश्मीर भाजपने देखील कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. रंधावा यांचे वक्तव्य पक्षाच्या मूलभूत तत्त्वांच्या विरुद्ध आहे. भाजप सर्व धर्मांचा आदर करण्यावर विश्वास ठेवते. रंधावा यांचा व्हिडिओ पक्षश्रेष्ठींच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांना तत्काळ कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. रंधावा यांनी व्हिडीओत जी भाषा वापरली आहे, तशी भाषा सहन केली जाऊ शकत नसल्याचे भाजपचे रविंदर रैना म्हणाले.