दिवाळी आणि फटाके, काय आहे हा संबंध

दिवाळी आणि फटाके यांचे अतूट नाते आहे. प्रदूषणामुळे फटाके उदाविण्यावर, खरेदी विक्रीवर अनेक राज्यांनी बंदी घातली असली तरी मुळात दिवाळीत फटाके उडविण्याची प्रथा आली कोठून हे जाणून घेणे मनोरंजक आहे. असे सांगतात कि २२०० वर्षापूर्वी चीनच्या लुईयांग भागात फटाके उडविल्याचे पुरावे कागदोपत्री सापडतात. चीन मध्ये प्राचीन काळापासून भुतेखेते, आत्माप्रेते यांच्या सावटापासून सुटका मिळावी म्हणून आवाजाचे फटाके उडविण्याची प्रथा आहे आणि आजही ती सुरु आहे. या आवाजाला घाबरून भुते पळून जातात असा समज आहे. सुरवातीला बांबूच्या छड्या आगीत टाकल्या जात असत. बांबूच्या गाठी आगीत जाळल्या कि त्यातून मोठा आवाज येत असे.

पण प्रत्यक्ष फटाके किंवा तिची दारू याचा शोध अचानकच लागला होता. काही चीनी सैनिकांनी एका डोंगरावरून आणलेली पिवळी माती एका बगीच्यात टाकली. तेथे अगोदरच कोळसे होते. कडक उन्हात तापल्यावर हा मातीचा जोरदार स्फोट झाला कारण हि माती म्हणजे सल्फर होते आणि सल्फर कोळसा संयोगातून स्फोटक तयार झाले होते. नंतर चीन मध्येच पोकळ बांबू मध्ये हे मिश्रण भरून पहिला हँडमेड फटाका बनविला गेला. नंतर त्यासाठी बांबू ऐवजी कागद वापरला गेला.

युरोपने मात्र फटाक्यातील दारूचा फॉर्म्युला सर्वप्रथम रॉजर बेकन या रसायनतज्ञाने बनविल्याचा दावा केला आहे. १३ ते १५ व्या शतकात चीन युरोप आणि अरब देशात फटाक्यांची आतषबाजी केल्याचे उल्लेख येतात. अमेरिकेत पहिल्या स्वातंत्रदिनी अताश्बाही केली गेली होती. भारतात आठव्या शतकात वैशंपायन नीती प्रकाशिका मध्ये पुडी नावाने फटाक्याचा उल्लेख आहे. इसवी सन पूर्वी ३०० वर्षे कौटिल्य अर्थशास्त्रात अग्नीचूर्ण नावाने उल्लेख आहे. ज्वलनशील, तीव्र उष्णता निर्माण करणारे आणि नळीत घालून पेटविल्यास धमाका करणारे असे याचे वर्णन आहे.

विजयनगर साम्राज्यात अब्दुल रझ्झाक या परदेशी राजदूताने १४४३ मध्ये महानवमी उत्सवाचे वर्णन केले असून त्यात फटाके आतषबाजीचा उल्लेख आहे. १५१८ मध्ये गुजराथ येथे एका ब्राह्मण कुटुंबातील विवाहात फटाके आतषबाजीचे वर्णन केले गेले आहे. १७ व्या शतकात दिल्ली आग्रा येथे आलेल्या फ्रेंच प्रवासी बर्नियार याने करमणूक आणि मनोरंजन यासाठी आतषबाजी केली गेल्याचे वर्णन लिहून ठेवले आहे.१८२० मध्ये बडोदा महाराजानी विवाह समारंभात ३ हजार रुपयांची फटाके आतषबाजी केल्याची नोंद इतिहासात आहे. विजापूर सुलतान आदिलशाह याने मुलीच्या लग्नात ८० हजार रुपयांची फटाके आतषबाजी केल्याचेही नमूद केले गेले आहे.

दिवाळीत फटाके उडविण्याची सुरवात नक्की कधी झाली याचे स्पष्ट पुरावे नसले तरी महादजी शिंदे यांनी पेशवे सवाई माधवराव यांना लिहिलेल्या पत्रात आतषबाजीचे वर्णन आहे. १९२३ मध्ये अय्या नादर आणि शन्मुगा नादर कोलकाता येथे काडेपेटी कारखान्यात काम करत होते.१९४० मध्ये स्फोटके कायद्यात सुधारणा झाल्यावर त्यांनी शिवकाशी येथे पहिला फटाका कारखाना सुरु केला. आज देशातील ८० टक्के फटाके शिवकाशी येथेच बनतात आणि त्यातून १० लाख लोकांना रोजगार मिळतो. दरवर्षी या व्यवसायात देशात ५ हजार कोटींची उलाढाल होते असे समजते.