दीड वर्षात करोनाने जगभरात घेतले ५० लाखाहून अधिक जीव

गेल्या दीड वर्षापासून जगात हाहाकार माजविलेल्या करोनाने घेतलेल्या बळींची संख्या सोमवारी ५० लाखाहून अधिक झाली असून कोविड १९ मुळे दोन वर्षापेक्षा कमी काळात इतकी प्रचंड मनुष्यहानी झाल्याचे म्हटले जात आहे. कोविड १९ ने केवळ गरीब देशानाच नाही तर अगदी विकसित आणि समृध्द, जेथे आरोग्यसेवा उत्तम दर्जाच्या आहेत अशा देशात सुद्धा मृत्यूचे तांडव केले आहे. अमेरिका, युरोपियन युनियन, ब्रिटन, ब्राझील या अतिविकसित, मध्यमविकसित आणि उच्च इन्कम असलेल्या देशात कोविड मुळे बळी जाण्यारऱ्यांची संख्या सर्वाधिक असल्याचे आकडेवारी सांगते. या देशांत जगाच्या एकूण लोकसंखेच्या आठवा हिस्सा इतकी लोकवस्ती आहे. कोविड मुळे मृत्युमुखी पडलेल्यांची निम्मी संख्या याच देशातील आहे.

एकट्या अमेरिकेत आत्तापर्यंत ७ लाख ४० हजार कोविड १९ मृत्यू झाले आहेत असे जॉन हॉपकीन विश्वविद्यापिठाची आकडेवारी सांगते. पीस रिसर्च इंस्टीटयूट ऑफ ओस्लो नुसार १९५० पासून आत्तापर्यंत युद्धात जितके बळी गेले तितकेच बळी कोविडने दोन वर्षापेक्षा कमी वेळात घेतले आहेत. हृदयरोग, मेंदूविकार नंतर मृत्यू संखेत करोना तीन नंबरवर आहे.

काही तज्ञांच्या मते करोना बळीचा आकडा निश्चितच कमी नोंदविला गेला आहे. याचे कारण जे मृत्यू झाले ते करोनामुळे झाले वा नाही याच्या चाच्यांना केल्या गेलेल्या नाहीत. तसेच अनेक करोना रुग्ण कोणतेही उपचार न होता घरातच मृत्युमुखी पडले आहेत. अविकसित देशात हा आकडा मोठा आहे. आता पुन्हा नव्याने करोना रशिया, युक्रेन, पूर्व युरोप, चीन मध्ये फैलावत आहे. पूर्व युरोपीय देशात लसीकरण खूपच कमी झाले आहे. समृद्ध देशात नागरिकांचे आयुर्मान अधिक आहे. तेथे कॅन्सरचे प्रमाण तसेच वृद्ध नागरिकांचे प्रमाण जास्त आहे आणि करोनाचा सर्वाधिक धोका याच लोकांना आहे. तुलनेने अविकसित आणि गरीब देशात लहान मुले, किशोर, युवा अधिक संखेने असून त्याच्यात करोना गंभीर रूप धारण करत नाही असेही दिसून आले आहे.