आज धनत्रयोदशी, त्यानिमित्ताने जाणून घेऊ सोन्याविषयी काही रोचक माहिती

प्रत्यक्ष दिवाळीपूर्वी दोन दिवस साजरा होणारा उत्सव म्हणजे धनत्रयोदशी. हा दिवस व्यापारी, उद्योजक यांच्या साठी तसेच डॉक्टर्स लोकांसाठी महत्वाचा आहे. या दिवशी व्यापारी लक्ष्मी आणि संपत्तीचा देव, देवांचा सावकार कुबेर याची पूजा करतात. तर वैद्यकीय क्षेत्रात हा दिवस धन्वंतरी पूजन करून साजरा केला जातो. आयुर्वेदाटचा जनक म्हणून धन्वंतरी पूजा केली जाते. या दिवशी सोने खरेदीला महत्व असून सर्वसामान्य नागरिक सुद्धा या दिवशी थोडे का होईना पण सोने खरेदी करण्यास प्राधान्य देतात. सोने हे केवळ भारतीयच नव्हे तर जगातील बहुतेक नागरिकांचे आकर्षण आहे. काय आहे या सोन्याचा इतिहास? सोन्याला इतके महत्व का दिले जाते? सोन्याचे दागिने कधीपासून वापरत आले आणि आज कोणत्या देशाकडे किती सोने अशी काही रोचक माहिती खास आमच्या वाचकांसाठी

अमेरिकन नॅशनल मायनिंग असोसिएशन नुसार उत्तर युरोप मधील एक वस्ती ख्रिस्तपूर्व ४००० वर्षापूर्वी सजावटीसाठी सोन्याचा वापर करत होती. भारताचा विचार करायचा तर सिंधू संस्कृतीत म्हणजे २५०० वर्षापूर्वी सोन्याचे दागिने प्रचलित होते. पण पृथ्वीवर सोने आले ते मात्र उल्कापिंडातून. पृथ्वीच्या जन्मानंतर २० कोटी वर्षांनी उल्कापिंड स्फोटातून पृथ्वीवर बहुतेक धातू वितळलेल्या स्वरुपात आले आणि पृथ्वीच्या गाभ्यात शिरले. गोल्ड हा शब्द जर्मेनिक भाषेतला असून त्याचा अर्थ पिवळा हिरवा असा आहे. सोन्याचे रासायनिक नाव एयु हे लॅटीन औरम या शब्दापासून आला असून त्याचा अर्थ आहे उगवत्या सूर्याची चमक.

सोन्यावर हवा, पाणी आणि अॅसिडचा परिणाम होत नाही मात्र हायड्रोक्लोरिक आणि नायट्रिक अॅसिड एकत्र केले तर त्या द्रावणात सोने वितळते. सोने अतिशय लवचिक आहे आणि १ औंस म्हणजे २८ ग्राम सोन्यापासून ८ किमी लांबीची तार बनविता येते तसेच सोने ठोकून त्याचा अगदी पारदर्शी पत्रा सुद्धा बनविता येतो. ८० किलो वजन असलेल्या माणसाच्या शरीरात २ मिलीग्राम सोने असते.

भारत आणि भारतीयांचे सोने वेड जगप्रसिद्ध आहे. भारतीयांच्या घरात अमेरिकेच्या सरकारी खजिन्याच्या तिप्पट म्हणजे २५००० टन सोने आहे असे म्हणतात. अमेरिकेकडे सोन्याचा सरकारी साठा ८१३३.४६ टन आहे तर भारताकडे सरकारी सोने साठा ६८६.८ टन आहे. भारतीय मंदिरातून ४ हजार टनाहून अधिक सोने आहे. केरळ पद्मनाभ मंदिरातून २०११ मध्ये १३०० टन सोने मोजले गेले होते तर तिरुपती बालाजी मंदिरात दरवर्षी १०० किलो सोने दान म्हणून येते.

सोन्याची तस्करी करण्यात भारताचा पहिला नंबर असून दरवर्षी देशात किमान ३०० टन सोने अवैध मार्गाने येते. भारतीयांच्या मनात सोन्याचे आकर्षण असण्यामागे अनेक कारणे सांगितली जातात. सोन्याचे दागिने हा भारतीयांसाठी स्टेटस सिम्बॉल आहे. मध्यमवर्गीय बचत म्हणून सोने घेतात. सोने कुठेही, कुठल्याही परिस्थितीत चालते म्हणजे अडचणीच्या काळात सोन्याच्या बदली रोख पैसे मिळू शकतात. सर्वात महत्वाचे म्हणजे भारतीय धर्म, पूजा पाठ यांच्याशी सोन्याचा संबंध जोडला गेला आहे त्यामुळे सोने अंगावर घालणे पवित्र मानले जाते.