अखेर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना इडी कडून अटक, आज घेणार कस्टडी
भ्रष्टाचार, लाचखोरी, मनी लाँड्रींग प्रकरणातील आरोपी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना १२ तासाच्या चौकशीनंतर सोमवारी रात्री उशिरा अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) अटक केली असून मंगळवारी त्यांना स्थानिक न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. त्यावेळी देशमुख यांच्यासाठी कोठडीची मागणी केली जाईल असे समजते. ईडी अधिकारी तासीन सुलतान आणि त्याच्या टीमने देशमुख यांची सतत १२ तास कसून चौकशी केली. मात्र एनसीपी नेते अनिल देशमुख यांनी त्यांना विचारण्यात आलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यास टाळाटाळ केली असे समजते.
सोमवारी दुपारी पावणेबाराच्या सुमारास देशमुख द.मुंबईच्या बेलार्ड पियर येथील ईडी ऑफिस मध्ये हजर झाले त्यानंतर त्यांची चौकशी सुरु झाली. मुंबई पोलिसाच्या १०० कोटी लाच, वसुली रॅकेट मध्ये मनी लाँड्रींग कायद्याखाली देशमुख यांची जबानी नोंदवून घेण्यात आली आहे. ईडी ने यापूर्वी पाच वेळा समन्स बजावून सुद्धा देशमुख ईडी पुढे हजर झाले नव्हते. हायकोर्ट, सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून देशमुख निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी करत होते. गेल्या आठवडयात उच्च न्यायालयाने ईडीने देशमुख यांच्यावर बजावलेले समन्स रद्द करण्यास नकार दिल्याने अखेर देशमुख यांना ईडी समोर हजर व्हावे लागले आहे.
ईडी कार्यालयात जाण्यापूर्वी देशमुख यांनी एक व्हिडीओ प्रसारित केला असून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीरसिंग कुठे आहेत असा सवाल केला आहे. परमवीरसिंग यांनीच हाताखालच्या पोलीस अधिकाऱ्यांमार्फत पब, रेस्टॉरंट, बार मालकांकडून दरमहा १०० कोटींची वसुली करण्याचे आदेश दिले होते असे देशमुख यांचे म्हणणे आहे. त्यावर हायकोर्टाने सीबीआय कडे तपास सोपविण्याचे आदेश दिले होते आणि त्यानंतर या प्रकरणात ईडीचा प्रवेश झाला होता. देशमुख यांचे सहाय्यक कुंदन शिंदे आणि खासगी सचिव संजीव पलांडे यांना अगोदरच अटक केली गेली आहे.
देशमुख यांनी प्रसारीत केलेल्या व्हिडीओ मध्ये आपण कधीच कुठे पळून गेलो नव्हतो, आपल्यावर फरारी झाल्याचे खोटे आरोप केले गेले आणि आपण न्यायालयात फक्त निष्पक्ष चौकशी साठी याचिका दाखल केली होती असे सांगून परमवीर यांच्यावर टीका केली आहे. परमवीर बेईमान आहेत असेही ते म्हणतात.