विराटच्या दहा महिन्यांच्या मुलीलाही विकृतांनी अर्वाच्य भाषेत केले ट्रोल


दुबई – टीम इंडियाने सध्या सुरू असलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये आपल्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानकडून १० गड्यांनी पराभव पत्करला. हा दारुण पराभव जिव्हारी लागल्यानंतर काही धर्मांधांनी सोशल मीडियावरून भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला लक्ष्य केले होते. पण, भारताच्या अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी, तसेच सर्वसामान्य क्रिकेट रसिकांनीही भारताच्या या गुणी गोलंदाजाची एकदिलाने पाठराखण केली. शमीला विराट कोहलीनेही पूर्णपणे पाठिंबा दिला. शमीला लक्ष्य करणाऱ्या धर्मांधांना विराटने खडसावले आणि एखाद्या व्यक्तीला त्याच्या धर्मामुळे लक्ष्य करणे अतिशय निंदनीय असल्याचे मत व्यक्त केले. विराटच्या या वक्तव्यानंतर काही विकृतांनी असभ्यपणे त्याच्या दहा-वर्षाच्या मुलीला लक्ष्य केले.

या विकृतांनी विराटवर सोशल मीडियावर राग व्यक्त करताना त्याच्या दहा महिन्यांच्या मुलीलाही सोडले नाही. अनेकजण सोशल मीडियावर विराटच्या मुलीवर अर्वाच्य भाषेत व्यक्त झाले. या दरम्यान सोशल मीडियावर व्यक्त होताना पातळी कशी सोडली जाते, हे या ट्रोलर्सकडून पाहायला मिळाले. असंवेदनशील टिप्पण्या आणि शिवीगाळ याचा परमोच्च बिंदू गाठल्यानंतर काहींनी या ट्रोलर्सला चांगलेच धारेवर धरले आहे.

पाकिस्तानचा माजी कप्तान इंझमाम उल हकही या घटनेनंतर भडकला. विराटच्या मुलीला धमकी देण्याचे वृत्त माझ्या कानी आले आहे. हा एक खेळ आहे, हे लोकांनी समजून घेतले पाहिजे. विराटच्या नेतृत्वावर टीका करण्याचा हक्क तुम्हाला आहे, पण त्याच्या कुटुंबीयाकडे कोणीच बोट दाखवू शकत नाही. विराटबाबत झालेली ही गोष्ट पाहून वाईट वाटले, असे इंझमामने म्हटले.