ऑक्टोबरमध्ये झालेल्या जीएसटी संकलनामुळे सरकारची तिजोरी २४ टक्क्यांनी वाढली


नवी दिल्ली – सोमवारी जीएसटी संकलनाची आकडेवारी सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. आकडेवारीनुसारी जीएसटीची विक्रमी वसुली ऑक्टोबरमध्ये झाली आहे. जीएसटी प्रणाली लागू झाल्यानंतर एवढा कर जमा होण्याची ही दुसरी वेळ आहे. सोमवारच्या आकडेवारीनुसार, १.३ लाख कोटी रुपयांचे ऑक्टोबर २०२१ मध्ये जीएसटी संकलन झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ऑक्टोबरमध्ये २४ टक्के अधिक कर जमा झाला आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत घट, शेअर मार्केटमध्ये तेजी याचा परिणाम जीएसटी संकलनावर स्पष्टपणे दिसून येत आहे.

सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, यावेळी जीएसटी म्हणून १,३०,१२७ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. त्यापैकी सीजीएसटी २३,८६१ कोटी रुपये, एसजीएसटी ३०,४२१ कोटी आणि आयजीएसटी ६७,३६१ कोटी रुपये (वस्तूंच्या आयातीवर जमा झालेल्या ३२,९९८ कोटी रुपयांसह) आणि उपकर ८,४८४ कोटी (वस्तूंच्या आयातीवर जमा झालेल्या ६९९ कोटी रुपयांसह) आहे.

जीएसटी लागू झाल्यापासूनचा वर्षभरातील हा दुसरा उच्चांक आहे. १.४ लाख कोटी रुपये या वर्षी एप्रिलमध्ये जीएसटीच्या रुपात ते जमा झाले होते. यापूर्वी सप्टेंबरमध्ये जीएसटी संकलन १,१७,०१० कोटी रुपये होते. ऑगस्टमध्ये जीएसटी संकलन १,१२,०२० कोटी रुपये आणि जुलैमध्ये १.१६ लाख कोटी रुपये होते. जूनमध्ये, जीएसटी संकलन एक लाख कोटी रुपयांपेक्षा कमी म्हणजेच ९२,8८४९ कोटी रुपये होते. मे महिन्यात ते ९८,००० कोटी रुपये होते. आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यात म्हणजेच एप्रिलमध्ये जीएसटी संकलन १.४१ लाख कोटी रुपये होते.