माणूस कितीही मोठा असला तरी कायद्याचे पालन करत यंत्रणासमोर जावेच लागते : प्रविण दरेकर


मुंबई – आज, सोमवारी ईडी कार्यालयात अनेक दिवसांपासून नॉट रिचेबल असणारे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हजेरी लावली. भाजप नेते प्रविण दरेकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, तपास यंत्रणापासून दूर जाता येत नाही. पाच-पाच समन्स दिल्यानंतरसुद्धा अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर राहत नव्हते. उच्च न्यायालयात, सर्वोच्च न्यायालयात दिलासा मिळेल, असा त्यांचा प्रयत्न होता. कारवाईला स्थगिती मिळेल, असे त्यांना वाटत होते. पण कोणत्याच न्यायालयाने त्यांना दिलासा न दिल्यामुळे त्यांचा नाईलाज झाला. आज ईडीसमोर हजर राहण्याशिवाय त्यांना गत्यंतर नव्हते. त्यामुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले की, माणूस कितीही मोठा असला तरी कायद्याचे पालन करत यंत्रणासमोर जावेच लागते.

ईडीच्या पाच समन्सनंतरही त्याला प्रतिसाद देत नसतील, तर यंत्रणेच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभे राहते. त्यामुळे अलिकडील काळात ईडीचीही मस्करी करायला लागले. पण शेवटी तपास यंत्रणेने दाखवून दिले की कायद्यापेक्षा यंत्रणेपेक्षा कुणीही मोठे नाही. त्यांच्याकडून न्यायालयातही प्रयत्न करण्यात आले, पण दिलासा मिळाला नाही. शेवटी कायद्यासमोर झुकावे लागले, असे प्रविण दरेकर म्हणाले.

महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रामध्ये सर्वच स्तरावर अपयशी ठरले आहे. घोषणा झाली पण शेतकऱ्यांना अद्याप मदत नाही. 30 पेक्षा जास्त एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या, याबद्दल कुठेही भाष्य नाही. कुठलीही कारवाई नाही. मग अशावेळी केंद्र सरकारवर आरोप करत आपले अपयश झाकले जात आहे. महाविकास आघाडी सरकारचा नियोजनबद्ध कार्यक्रम दिसतो, असा टोला यावेळी प्रविण दरेकर यांनी राज्य सरकारला लगावला.