बॉम्ब फोडण्याचे वक्तव्य करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना नवाब मलिक यांचे चॅलेंज


मुंबई: कॉर्डेलिया क्रुझ पार्टी प्रकरणानंतर सुरु झालेल्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी काही केल्या थांबायचे नाव घेत नाहीत. दररोज नवनवे आरोप आणि खुलासे समोर येत आहेत. समीर वानखेडे यांच्यावरील आरोपापासून सुरु झालेले प्रकरण आता देवेंद्र फणडवीस यांच्यापर्यंत पोहचले आहे. सोमवारी पत्रकार परिषद घेत थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर ड्रग्ज कनेक्शसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आरोप केले. देवेंद्र फडणवीस यांनी या आरोपाला तात्काळ प्रत्युत्तर देत दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार असल्याचा इशारा दिला होता. देवेंद्र फडणवीस यांच्या या इशाऱ्याला आता नवाब मलिक यांनी थेट चॅलेंज दिले आहे.


काचेच्या घरात मी राहत नाही. अंडरवर्ल्डशी ज्यांचे संबध आहेत. अशा लोकांनी माझ्याशी बोलू नये आणि ड्रग्ज संदर्भातही बोलू नये. अंडरवर्ल्ड संदर्भातील पुरावे आपल्यासमोरही मांडेल आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही पाठवणार आहे. दिवाळी संपण्याची वाट पाहा. त्यांनी सुरुवात केली आहे, शेवट मी करेन. दिवाळीच्या दिवशी नवाब मलिक यांनी लवंगी फटाका लावला आहे, दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडणार, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिला होता. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेनंतर नवाब मलिक यांनी ‘है तैयार हम!’ असे ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांना थेट चॅलेंज केले आहे. विशेष म्हणजे हे ट्विट नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले आहे.