२६५ रुपयांनी महागला एलपीजी सिलेंडर


नवी दिल्ली – एलपीजीच्या महागाईचा बॉम्ब दिवाळीच्या पहिल्याच दिवशी फुटला आहे. काल एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात आता २६५ रुपयांनी वाढ करण्यात आल्यामुळे सणासुदीच्या काळात महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी एक नोव्हेंबर रोजी व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजीच्या दरात वाढ झाल्याची घोषणा केली आहे. केवळ व्यावसायिक सिलेंडरमध्येच ही वाढ झाली आहे, ही दिलासादायक बाब आहे. कोणताही बदल घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत झालेला नाही.

या नव्या दरांमुळे व्यावसायिक वापराचा १९ किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत १७३६.५ रुपयांवरुन २०००.५ रुपये एवढी झाली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती वापरासाठीच्या १४.२ किलो विनाअनुदानित एलपीजी सिलेंडरच्या किमतीत वाढ केलेली नाही. दिल्लीत १४.२ किलोच्या विनाअनुदानित एलपीजी सिलेंडरची किंमत ८९९.५० रुपयांवर कायम आहे. गेल्या महिन्यात पेट्रोलियम कंपन्यांनी विनाअनुदानित १४.२ किलोच्या सिलेंडरची किंमत १५ रुपयांनी वाढवली होती.

केवळ १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या दरात एक ऑक्टोबर रोजी वाढ करण्यात आली होती. कोलकात्यात ९२६ आणि चेन्नईमध्ये १४.२ किलोचा एलपीजी सिलेंडर ९१५.५० रुपयांना उपलब्ध आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती पाहता यावेळी एलपीजी सिलेंडरची किंमत १००० रुपयांच्या पुढे जाण्याची भीती व्यक्त केली जात होती. आता दिल्लीत विनाअनुदानित १४.२ किलोच्या सिलेंडरची किंमत ८९९.५० रुपये आहे. कोलकातामध्ये एलपीजी सिलेंडरची किंमत ९२६ रुपये, मुंबईत ८९९.५० रुपये आहे. चेन्नईमध्ये विनाअनुदानित सिलेंडरची किंमत आता ९१५.५० रुपये आहे.