टीम इंडियाच्या खेळाडूंना शिवीगाळ करणाऱ्या विरोधात हिंदुस्तानी भाऊ पोलिसात


मुंबई – पुन्हा एकदा सोशल मीडियावर कायम चर्चेत असलेल्या हिंदुस्तानी भाऊचा पारा चढला आहे. भारत-पाकिस्तान सामन्यानंतर टीम इंडियाच्या पराभवावर आनंद साजरा करणाऱ्यांवर हिंदुस्तानी भाऊ चांगलाच भडकला आहे. त्याचबरोबर त्याने सोशल मीडियावरून टीम इंडियाच्या पराभवानंतर आनंद साजरा करत पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या एका व्यक्ती विरोधात खार पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे.

टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये भारत-पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागल्यानंतर काहींनी भारताच्या पराभवावर फटाके फोडत जल्लोष साजरा केला. या जल्लोष साजरा करत पाकिस्तानला सपोर्ट करणाऱ्यांवर हिंदुस्तानी भाऊ चांगलाच संतापला आहे. एक व्हिडीओ शेअर करत मालवणीमधील हसन कोटी या व्यक्तीने भारतीय क्रिक्रेटर्सवर टीका केली होती. तसेच त्याचा पाकिस्तानला पाठिंबा असून मुंबई पोलीस आपल्याला काहीही करू शकत नाही असे, तो म्हणाला होता. या व्यक्तीविरोधात सगळ्यात आधी हिंदुस्तानी भाऊने पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

हिंदुस्तानी भाऊ यावेळी संताप व्यक्त करत म्हणाला, याच देशात खाऊन, जर पाकिस्तानचं कौतुक करत असाल, तर पाकिस्तानमध्ये जा. तुमचे या देशात काय काम आहे. ही लोक पाकिस्तानचा विजय झाला म्हणून खूश झाली नसून यांना भारताच्या पराजयाचा जास्त आनंद झाला आहे. अनेक ठिकाणी या लोकांनी फटाके फोडले, मिठाई वाटली. या लोकांना वेळेवर उत्तर देणे गरजेचे असल्याचे म्हणत भारताच्या पराजयावर आनंद साजरा करणाऱ्यांविरोधात सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे तो म्हणाला.

यावेळी हिंदुस्तानी भाऊने लवकरात लवकर देशाविरोधात आणि हिंदूविरोधात अपमानजनक वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. तसेच अशा लोकांना कठोर शिक्षा होणे गरजेचे असल्याचे तो म्हणाला. देशाविरोधात तसेच हिंदू धर्माविरोधात अपमानजनक वक्तव्य करणाऱ्यांना याआधी देखील हिंदुस्तानी भाऊने सडेतोड उत्तर दिले आहे.