आजपासून ट्रेनच्या वेळापत्रकासह अन्य गोष्टींच्या नियमामध्ये होणार बदल


नवी दिल्ली – देशात आजपासून म्हणजेच १ नोव्हेंबर २०२१ पासून अनेक नियम बदलत आहेत आणि अनेक बदल लागू केले जात आहेत. यामध्ये एलपीजी सिलेंडर बुक करण्याच्या नवीन पद्धतीचाही समावेश आहे. दुसरीकडे बँक ऑफ बडोदाने आपल्या ग्राहकांना धक्का दिला असून कर्ज घेण्यावर सेवा शुल्क लागू केले आहे. आजपासून दिल्लीतील सर्व वर्गांच्या शाळा सुरू करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

आपल्या ग्राहकांना सरकारी बँक ऑफ बडोदाने दणका दिला आहे.जर ग्राहकाने कोणत्याही प्रकारचे ऑफलाइन किंवा ऑनलाइन कर्ज घेतले असेल किंवा ठराविक वेळेपेक्षा जास्त वेळा ठेवी आणि पैसे काढले असतील तर त्याला १५० रुपये सेवा शुल्क भरावे लागेल. बँकेने पैसे काढणे आणि ठेवीवर १५० रुपये सेवा शुल्क आकारले आहे. १ नोव्हेंबरपासून रेल्वेचे वेळापत्रकही बदलणार आहे. यामुळे सर्व गाड्यांच्या आगमन आणि सुटण्याच्या वेळेतही बदल होईल.

आजपासून बँक ऑफ बडोदाची सेवा महागणार आहे. बँक ऑफ बडोदामधून तीनदा पैसे काढणे विनामूल्य असेल, परंतु त्यानंतर १५० रुपये सेवा शुल्क भरावे लागेल. हे शुल्क कर्जासाठी भरावे लागणार आहे. तर तीनपेक्षा जास्त वेळा पैसे जमा केल्यास ४० रुपये शुल्क भरावे लागेल. तथापि, जन धन खात्यांवर असे कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता या बँकेशी संबंधित पेन्शनधारकांना त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही, ते ही प्रक्रिया व्हिडीओ कॉलद्वारे पूर्ण करू शकतील.

रेल्वेच्या अनेक गाड्यांच्या वाहतुकीच्या वेळेत बदल होणार आहेत, कारण आजपासून रेल्वेचे वेळापत्रकही बदलणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १०० हून अधिक गाड्यांचे वेळापत्रक बदलणार आहे. पॅसेंजर गाड्यांव्यतिरिक्त मालगाड्या आणि काही राजधानी एक्स्प्रेसचे वेळापत्रकही बदलत आहे.

सरकारने एलपीजीसाठी (एलपीजी बुकिंग ओटीपी) व्हॉट्सअॅप आणि ओटीपी आधारित बुकिंग सेवाही सुरू केली आहे. यामध्ये एलपीजी सिलिंडरसाठी ग्राहकाच्या नोंदणीकृत क्रमांकावर ओटीपी पाठवला जाईल. सिलिंडर घेताना हा ओटीपी ग्राहकाला त्याच्या गॅस एजन्सीच्या एजंटसोबत शेअर करावा लागेल. स्वयंपाकाच्या गॅसचे ग्राहक या सेवेचा लाभ घेऊ शकतात. त्याचबरोबर सरकार दर महिन्याला एलपीजी गॅसच्या किंमतीचाही आढावा घेते. अशा परिस्थितीत घरगुती गॅस सिलिंडरची किंमतही वाढू शकते.

महिन्याच्या सुरुवातीला पेट्रोलियम कंपन्या एलपीजी सिलिंडरच्या किंमती वाढवतात. गेल्या आठवड्यातच बातमी आली होती की या आठवड्यात स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर आणखी महाग होऊ शकतात, अशा परिस्थितीत गॅस सिलिंडरच्या किंमतीही वाढू शकतात.

आजपासून व्हॉट्सअॅप सेवा काही स्मार्टफोनमध्ये काम करणार नाहीत. व्हॉट्सअॅपने आधीच माहिती दिली आहे की १ नोव्हेंबरपासून त्याच्या सेवा अनेक जुन्या आवृत्तीच्या अँड्रॉइड फोनमध्ये काम करणार नाहीत. व्हॉट्सअॅपच्या म्हणण्यानुसार, त्याची सेवा Android 4.0.3, सँडविच आणि KaiOS आवृत्तीवर काम करणार नाही.