नवाब मलिक यांनी ड्रग्ज संबधात केलेल्या आरोपाचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून खंडन


मुंबई – ड्रग्ज संबधात अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपाचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खंडन केले आहे. नवाब मलिक यांनी दिवाळीच्या पहिल्या दिवशी लवंगी फटाका लावला, मी दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार, असा इशारा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. नवाब मलिक यांनी सोमवारी सकाळी पत्रकार परिषद घेत राज्यातील ड्रग्ज प्रकरणाचे मास्टरमाईंड देवेंद्र फडणवीस असल्याचा आरोप केला होता.

देवेंद्र फडणवीस यांनी या आरोपाला उत्तर देताना नवाब मलिक यांना गर्भित इशारा दिला आहे. अंडरवर्ल्डशी नवाब मलिक यांचे संबध असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना याचे पुरावे देणार असल्याचे ते म्हणाले. दिवाळीच्या पहिल्या दिवशी लवंगी फटाका वाजवून फार मोठा आवाज केल्याचा आव नवाब मलिक आणत आहेत. ते कोणत्या मानसिकतेत आहेत, हे सर्वांना माहित आहे. एक फोटो नवाब मलिक यांनी पोस्ट केला, त्यासंदर्भात रिव्हर मार्चच्या संदर्भातील लोकांनी स्पष्टीकरण दिले आहे. आमच्या क्रिएटिव्ह टीमने हायर केलेला हा व्यक्ती होता. हा फोटो चार वर्षांपूर्वीचा आहे. त्यांना आज सापडला. आमचा त्या व्यक्तीशी संबध नाही. गाण्याच्या शुटींगवेळी सर्व फोटो काढण्यात आले आहेत. सर्व टीमने फोटो काढले होते. पण नवाब मलिक यांनी फक्त माझ्या पत्नीसोबतचा फोटो ट्विट केला आहे. यावरुन त्यांची मानसिकता दिसत असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

ज्या प्रकारे नवाब मलिक म्हणाले की, भाजपचे ड्रग्ज कनेक्शन आहे. एखाद्या अनोळखी व्यक्तीबरोबर जर फोटो काढल्यानंतर ड्रग्ज कनेक्शन जोडले जात असेल, तर नवाब मलिक यांचे जावई ड्रग्जसकट सापडले. जर नवाब मलिक यांचा रेशिओ लावायचा असेल, तर संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस ड्रग्ज माफिया झाली पाहिजे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी नवाब मलिक यांनी लवंगी फटाका लावला, दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडणार असल्याचा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

काचेच्या घरात मी राहत नाही. ज्यांचे संबध अंडरवर्ल्डशी आहेत. अशा लोकांनी माझ्याशी बोलू नये आणि ड्रग्ज संदर्भातही बोलू नये. आपल्यासमोरही अंडरवर्ल्ड संदर्भातील पुरावे मांडेल आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही पाठवणार आहे. दिवाळी संपण्याची वाट पाहा. त्यांनी सुरुवात केली आहे, शेवट मी करेन, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. संपूर्ण प्रकरणात आपल्या जावयाची चार्जशीट कमकुवत व्हावी. अन् एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दबावामध्ये येऊन आपल्या जावयाला सुटण्याकरिता मदत करावी, याकरिता हे सर्व सुरु आहे. पण मला वाटते कायदा सक्षम असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

नवाब मलिक यांनी तुमच्यावर नीरज गुंडे हे तुमचे सचिन वाझे आहेत? असा आरोप केला. फडणवीस या प्रश्नावर बोलताना म्हणाले की, नीरज गुंडे यासंदर्भात उत्तर देतील. पण नवाब मलिक यांनी नीरज गुंडेसंदर्भात आताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली पाहिजे. त्यांना विचारले पाहिजे. नीरज गुंडे यांच्याशी संबध आहेतच. पण जेवढे वेळा मी नीरज गुंडेच्या घरी गेलो, त्यापेक्षा जास्तवेळा गेल्या काही कालावधीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेले आहेत किंवा मी जेवढेवेळा मातोश्रीवर गेलो आहे, त्यापेक्षा जास्तवेळा नीरज गुंडे मातोश्रीवर गेले आहेत. कदाचित माझ्या आधीपासूनचे त्यांचे संबध असावेत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.