उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे हजारो कोटी रुपयांची बेनामी संपत्ती – किरीट सोमय्या


मुंबई – भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे हजारो कोटी रुपयांची बेनामी संपत्ती असल्याचा आरोप केला आहे. सोमय्या यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत अजित पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. हजारो कोटी रुपयांची बेनामी संपत्ती अजित पवार यांच्याकडे आहे. त्याची उत्तरे त्यांनी द्यावीत. सहा फटाक्यापैकी पहिला फटाका आज फोडला आहे, हिंमत असेल तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी समोरासमोर उत्तर द्यावे, असे यावेळी सोमय्या म्हणाले. नवाब मलिकांचे सारे आरोप हे केवळ पवार कुटुंबियांवर सुरू असलेल्या आयटीच्या धाडी लपवण्यासाठीच, हे घाणेरडे राजकारण केवळ शरद पवारच करू शकतात, नवाब मलिकांची तेवढी कुवत नाही. महाराष्ट्राला पवार परिवाराने खूप लुटले असल्याचेही सोमय्या म्हणाले.

यावेळी सोमय्या यांनी पवार कुटुंबाने महाराष्ट्राला लुटल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, अजित पवारांकडे एक हजार 50 कोटींची संपत्ती कुठून आली?, अजित पवारांनी यासंदर्भात माहिती द्यावी. पत्रकार परिषदेत यासंदर्भात ते कोणताही माहिती देत नसल्याचेही सोमय्या म्हणाले. दिवाळीनंतर राज्यातील तीन मंत्री आणि तीन जावई यांचे घोटाळे बाहेर काढणार, असे रविवारी ट्विट करत किरीट सोमय्या यांनी सांगितले होते. पण, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या पत्रकार परिषदेनंतर किरीट सोमय्या यांनीही पत्रकार परिषद घेत आरोपांची मालिका सुरु केली आहे. सोमवारी सकाळी पत्रकार परिषद घेत किरीट सोमय्या यांनी पवार कुटुंबावर निशाणा साधला. ते म्हणाले, पवार कुटुंबाचे जावई मोहन पाटील यांच्याकडे किती पैसे आले? कुठून पैसे आले? कसे आले? ते कुठे गेले? असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. सहा फटाक्यापैकी पहिला फटाका आज फोडला आहे, हिंमत असेल तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी समोरासमोर उत्तर द्यावे, असे यावेळी सोमय्या म्हणाले.

अजित पवारांच्या खात्यात बिल्डर्सकडून शेकडो कोटी रुपये आले आहेत. अजित पवार यांनी ते पैसे कुठे-कुठे ट्रान्सफर केले. जावई, बहिण, बायको, मुलगा आणि आईच्या खात्यात अजित पवार यांनी पैसे ट्रान्सफर केले. घोटाळ्याचे पैसे अजित पवार यांनी पूर्ण कुटुंबात ट्रान्सफर केले. ईडीच्या धाडी 19 दिवसांपासून सुरु आहेत. हजार कोटींपेक्षा जास्त बेनामी संपत्ती बाहेर आली आहे. यापासून लक्ष विचलीत व्हावे म्हणून नवाब मलिक यांना पुढे केले जात आहे. नवाब मलिकांची एवढी कुवत नाही, हे घाणेरडे राजकारण उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचे असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.