फडणवीस यांच्या बॉम्ब फोडण्याच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली प्रतिक्रिया


मुंबई – राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक दिवाळीच्या सुरुवातीला लवंगी फटाका वाजवून फार मोठा आवाज केल्याचा आव आणत आहेत. त्यांनी जो फोटो ट्विट केला आहे तो चार वर्षांपूर्वीचा आहे. आम्हाला रिव्हर मार्चच्या अधिकाऱ्यांनी विनंती केल्यानंतर आम्ही त्या मोहिमेशी जोडले गेलो होतो. त्यांना मी मदत करत होतो. जयदीप राणा हा भाड्याने आणलेला माणूस असल्याचे रिव्हर मार्चने स्पष्ट केल्यामुळे त्यांचा आणि आमचा काहीही संबंध नाही. दिवाळीपूर्वी लवंगी फटाका मलिकांनी फोडला आहे, दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. यावर प्रतिक्रिया देत मी पाकिस्तानमध्ये बॉम्ब फुटायची वाट बघत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटले. वर्षा या निवासस्थानी पत्रकारांबरोबरच्या परिसंवादामध्ये मुख्यमंत्री बोलत होते.

तसेच लसीकरण गेल्या काही दिवसांत कमी झाले आहे. लसीकरणासाठी नागरिक कमी प्रमाणात येत आहेत, त्यांना पकडून पकडून आणू शकत नाही. तर, कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही, हे कोणीच सांगू शकत नसल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान, मंत्रालय हे कार्यालय आहे, नक्कीच जायला पाहिजे, पण गेलो नाही म्हणून कामे झाली नाहीत असे झालं आहे का? मंत्रालयात जातो येतो, पाट्या टाकतो याला काही अर्थ नाही. वर्षा बंगल्यात कार्यालय आहे, येथून काम सुरू आहे. इतकी वर्षे जे मंत्रालयात जात होते, त्यांनी जे काय केले मला ते निस्तरायचे असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.