रशिया, चीन आणि इंग्लंडहून येणाऱ्या प्रवाशांसाठी केंद्राने नियमावली करावी: राजेश टोपे


जालना : आता काही प्रमाणात देशातील आणि राज्यातील कोरोनाचा धोका नियंत्रणात येत असल्याचे दिसून येत आहे. पण कोरोनाच्या संकटाने रशिया, चीन आणि इंग्लंड या देशांमध्ये पुन्हा एकदा डोके वर काढल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून या देशांतून येणाऱ्या प्रवाशांवर लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालनामध्ये माध्यमांशी संवाद साधताना म्हटले आहे.

देशातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असताना जगभरातील परिस्थितीवरही बारकाईने लक्ष ठेवणे अत्यावश्यक आहे. रशिया ,इंग्लड आणि चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आंतराष्ट्रीय विमानतळ आणि या देशातून येणाऱ्या प्रवाशांवर लक्ष ठेवण्याची गरज असल्यामुळे केंद्रीय आरोग्य विभागाने या बाबत योग्य तो निर्णय घ्यावा, तसेच आयसीएमआरने याबाबत नियमावली ठरवावी, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.

चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा एकदा उद्रेक झाल्याचे पहायला मिळतअसल्यामुळे चीनमध्ये कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. चीनमध्ये सर्वप्रथम कोरोनाचा प्रसार झाला होता, त्यानंतर जगभराला त्याचा सामना करावा लागला होता. ब्रिटन आणि रशियामध्येही कोरोनाच्या पहिल्या, दुसऱ्या लाटेने धुमाकुळ घातला होता. आता तिसऱ्या लाटेनेही डोके वर काढले असून या देशांमध्येही काही भागांत लॉकडाऊन करण्यात आले आहे. दरम्यान, राजेश टोपे यांनी दिवाळी साजरी करताना नागरिकांनी कोरोनाचे भान ठेवावे, तसेच फटाक्यांची आतिषबाजी करताना प्रदूषण होणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहन देखील केले आहे.