आगामी विधानसभा निवडणूक न लढण्याचा अखिलेश यादव यांचा निर्णय


लखनौ – उत्तर प्रदेशमध्ये सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू आहे. याच दरम्यान सोमवारी आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केली आहे. २०२२ मध्ये उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका होणार आहेत. सध्या अखिलेश यादव हे आझमगडमधून सपाचे खासदार आहेत. एकेकाळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले अखिलेश यादव यांना समाजवादी पार्टीकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा मानले जात होते, पण आपण निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

याबाबत अखिलेश यादव म्हणाले की, समाजवादी पार्टी आणि राष्ट्रीय लोक दल यांची राज्यातील निवडणुकासाठी युती झाली आहे. आमची आरएलडीसोबत युती ठरली असून लवकरच जागावाटपासंदर्भात अंतिम निर्णय घेतला जाईल. तसेच निवडणुकीत काका शिवपाल यादव यांच्या प्रगतीशील समाजवादी पार्टी लोहियाला (पीएसपीएल) सोबत घेण्याच्या शक्यतेवर ते म्हणाले, त्यांच्यासोबत युती करण्यात मला कोणतीही अडचण नाही. त्यांना आणि त्यांच्या पक्षातील लोकांना योग्य आदर दिला जाईल.

दरम्यान, उत्तर प्रदेशातील सर्व स्तरातील लोकांनी २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाला राज्यात सत्तेवर आणण्याचा निर्णय घेतला असल्याचा दावा अखिलेश यादव यांनी रविवारी केला होता. तसेच सपा सत्तेत आल्यानंतर उत्तर प्रदेश पुन्हा समृद्धीच्या मार्गावर येईल, असे हरदोई येथील एका जाहीर सभेला संबोधित करताना ते म्हणाले.