2013 साली पाटणाच्या गांधी मैदानात झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील 4 दोषींना फाशीची शिक्षा


पाटणा – एनआयएच्या विशेष न्यायालयाने आज बिहारची राजधानी पाटणा येथील गांधी मैदानात 2013 साली झालेल्या बॉम्बस्फोटाप्रकरणी निकाल जाहीर केला आहे. बॉम्बस्फोटातील 4 दोषींना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे, तर दोघांना जन्मठेपेची आणि दोन दोषींना 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय एका दोषीला सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

पाटणा येथील गांधी मैदानात 2013 साली झालेल्या या बॉम्बस्फोटात 79 जण जखमी झाले होते. या प्रकरणी न्यायालयाने बुधवारी 9 आरोपींना दोषी ठरवले होते, तर एका आरोपीची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. विशेष सरकारी वकील लालन प्रसाद सिंह यांनी सांगितले की, 2013 च्या गांधी मैदान साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात इम्तियाज अन्सारी, मुजिबुल्ला, हैदर अली, फिरोज अस्लम, नोमन अन्सारी, इफ्तिखार, अहमद हुसैन, उमर सिद्दीकी आणि अझरुद्दीन यांना एनआयए न्यायालयाचे विशेष न्यायाधीश गुरविंदर मल्होत्रा यांनी दोषी ठरवले, तर फखरुद्दीनला पुरावे न मिळाल्याने निर्दोष घोषित करण्यात आले.

एनआयएचे वकील लालन प्रसाद सिन्हा यांनी सांगितले की, साक्षीदाराच्या जबाबाव्यतिरिक्त इलेक्ट्रॉनिक फॉरेन्सिक प्रयोगशाळेच्या तपासणीच्या आधारे न्यायालयाने हा निकाल दिला आहे. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून जास्तीत जास्त नुकसान करण्याच्या कटाखाली ही घटना घडवण्यात आली होती. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. रायपूरमध्येच बॉम्बस्फोटाचा कट रचण्यात आल्याचे वकिलांनी सांगितले. रांचीमध्ये सामान गोळा करण्यात आले आणि पाटण्यात ही घटना घडली.

एनआयएने या प्रकरणात 11 आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते, त्यापैकी एका आरोपीला त्याच्या वयामुळे बाल न्यायालयात वर्ग करण्यात आले होते. त्यानुसार उर्वरित दहा आरोपींविरुद्ध एनआयए न्यायालयात खटला सुरू होता. दोषी ठरल्यानंतर न्यायालयाने शिक्षेवरील निर्णयासाठी 1 नोव्हेंबरची तारीख निश्चित केली होती.