रोमच्या ट्रेवी  फौंटनमध्ये मोदींसह अन्य देश प्रमुखांनी फ़ेकली नाणी

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी २० शिखर परिषदेत सामील होण्यासाठी इटली दौर्यावर गेले आहेत. रविवारी मोदी यांच्यासह या परिषदेला आलेल्या अन्य देशांच्या प्रमुख नेत्यांनी रोम मधील जगप्रसिद्ध ट्रेवी फौंटनला भेट देऊन या कारंज्यात नाणी टाकली. त्याचे फोटो मोठ्या प्रमाणावर शेअर केले जात आहेत आणि इटली सरकारने या घटनेचा एक व्हिडीओ जारी केला आहे.

ट्रेवी फौंटन हे जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ असून रोम मध्ये येणारा पर्यटक या कारंज्याला भेट देणारच अशी त्याची ख्याती आहे. इटली मधील सर्वाधिक भेट दिले जाणारे हे पर्यटनस्थळ असून पर्यटकाना त्याचे विशेष आकर्षण वाटते. या कारंज्याकडे पाठ करून उभे राहायचे आणि आपल्या खांद्यावरून मागे नाणे या कारंज्यात टाकायचे असते. त्यामुळे तुम्ही पुन्हा रोम ला भेट देता असा समज आहे. दररोज अशी शेकडो देश विदेशातील नाणी या कारंज्यात पडत असतात.

या ऐतिहासिक कारंज्याजवळ शेकडो चित्रपटाची शुटींग केली गेली असून चित्रपट दिग्दर्शकांचे हे आकर्षण आहे. बरोक शैली मध्ये उभारलेले हे स्मारक रोमान्सचे प्रतिक मानले जाते.