आनंद महिंद्रानी पूर्ण केला नीरज आणि अंकिलशी केलेला वादा

टोक्यो ऑलिम्पिक २०२० मध्ये भालाफेक प्रकारात भारताला पहिले सुवर्ण पदक मिळवून इतिहास रचलेला नीरज चोप्रा आणि पॅरालीम्पिक मध्ये देशाला भालाफेक प्रकारात सुवर्णपदक मिळवून देणारा सुमित अंकिल यांना महिंद्रा अँड महिंद्राचे अध्यक्ष आनंद महिद्रा यांनी नवी एक्सयुवी ७०० घरपोच करून केलेला वादा पूर्ण केला आहे. नीरजने सोशल मिडीयावर कार बरोबरचा फोटो शेअर करून आनंद महिंद्रा यांना धन्यवाद दिले आहेत आणि लवकरच कार चालविणार असल्याचे नमूद केले आहे.

आनंद महिंद्रा यांनीही ट्वीटरवर या दोघा विक्रमवीरांना एक्सयुव्ही ७०० दिल्याचे आणि सुमित याला पहिली गाडी दिल्याचे नमूद केले आहे. या दोन्ही गाड्या कस्टमाइज केल्या गेल्या आहेत. नीरजच्या कारसाठी एचआरओ ६ एझेड ८७५८ हा खास नंबर रजिस्टर केला गेला आहे तर सुमितच्या गाडीसाठी अजून नंबर मिळायचा आहे. नीरजच्या कारसाठी विशेष नंबर ८७५८ हा त्याने ८७.५८ मीटर भाला फेकून सुवर्णपदक मिळविल्याचे प्रतिक आहे. विशेष म्हणजे महिंद्राची ही एक्सयुव्ही अजून रस्त्यांवर आलेली नाही. त्यापूर्वीच नीरज आणि सुमित यांना हा गाड्या दिल्या गेल्या आहेत.

नीरजच्या कारचा रंग काळा असून त्यावर नीरजचा बेस्ट थ्रो ८७५८ असे लिहिले गेले आहे आणि थ्रोइंग पोझ दाखविली गेली आहे. सुमितच्या कार वर सुद्धा सुमित बेस्ट थ्रो ६८.५५ आणि थ्रोइंग पोझ दाखविली गेली आहे.