जुन्या नोटा नाणी विक्री, खरेदीवर रिझर्व बँकेकडून इशारा

गेले काही दिवस ऑनलाईन आणि ऑफलाईन वर जुन्या नोटा, नाणी विकून भरपूर पैसे मिळविण्याच्या जाहिराती सातत्याने येत आहेत. अश्या नोटा नाणी विकणाऱ्या आणि खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी रिझर्व्ह बँकेकडून एक सूचना जारी केली गेली आहे. त्यानुसार अश्या साईटवर  रिझर्व्ह बँक किंवा काही अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर केला जात असून रिझर्व्ह बँकेचा या प्रकाराशी कोणताही संबंध नसल्याचे त्यात नमूद केले गेले आहे. आरबीआयने त्यांच्या ट्वीटर हँडलवर या संदर्भात खुलासा केला आहे.

गेले काही दिवस रुपया, दोन रुपये, चार आणे अशी अनेक जुनी नाणी किंवा नोटा खरेदी विक्रीचा ट्रेंड मोठ्या प्रमाणावर सुरु झाला असून अश्या नोटा नाण्याचे संघ्राहक नाणी विक्रीसाठी उपलब्ध करत आहेत. या नाणी, नोटांच्या बदली मोठी रक्कम मिळेल असे सांगितले जात आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन त्या संदर्भातील जाहिराती रोज झळकत आहेत आणि त्यात रिझर्व्ह बँकेचा संदर्भ दिला जात आहे. त्यावर रिझर्व बँकेने हा फसवणुकीचा प्रकार असल्याचा इशारा दिला आहे. अनेक साईटवर अशी नाणी, नोटा विक्री किंवा खरेदीवर कमिशन किंवा शुल्क मागितले जात आहे. रिझर्व्ह बँकेने असा अधिकार कुणाही व्यक्ती, संस्था, कंपन्यांना दिलेला नसल्याचे स्पष्ट केले गेले आहे.

रिझर्व्ह बँक अशा कोणत्याही योजनेत सामील नाही आणि काही गुन्हेगारी वृत्तीचे लोक रिझर्व्ह बँकेच्या नावाचा वापर करून जुन्या नोटा, नाणी विक्री खरेदीवर कमिशन घेत आहेत त्यामुळे असे व्यवहार करणाऱ्यांनी सावधगिरी बाळगावी असा सल्ला दिला गेला आहे.