अशी होती भारतातील पहिली एसी ट्रेन

भारतीय रेल्वे जगातील चार नंबरचे मोठे नेटवर्क असून देशात ट्रेनमधून एकदाही प्रवास न केलेल्या प्रवाशांची संख्या फारच थोडी असेल. आता भारतीय रेल्वे खूपच आधुनिक आणि स्मार्ट बनली असून देशात बुलेट ट्रेन धावण्याचा दिवस फार दूर नाही. आजकाल एसी ट्रेन ही नवलाची बाब राहिलेली नाही. पण देशात पहिली एसी ट्रेन कधी धावली आणि ती कशी होती याची माहिती फार लोकांना नसेल.

भारतात पहिली एसी ट्रेन सुमारे ९२ वर्षापूर्वी धावली आणि आजही ती सुरु आहे हे ऐकून नक्कीच नवल वाटेल.या ट्रेनचे नाव होते फ्रंटीअर मेल. १ सप्टेंबर १९२८ मध्ये ही आगगाडी सुरु झाली आणि १९३४ मध्ये तिला एसी बोगी लावण्यात आल्या होत्या. त्यावेळी तिचे  पूर्वीचे पंजाब एक्स्प्रेस हे नाव बदलून फ्रंटीअर मेल असे केले गेले. ही ट्रेन खास म्हणावी अशीच होती. गाडीचे डबे थंड राहावेत म्हणून एक खास तंत्र वापरले जात असे. त्यात बोगीखाली बॉक्स मध्ये बर्फाच्या लाद्या ठेवून वरून पंखे लावले जात. त्यामुळे आतील हवा थंड राहत असे.

ही गाडी तेव्हा मुंबईपासून अफगाण सीमेपर्यंत धावत असे. ब्रिटीश अधिकारी आणि स्वतंत्रसेनानी सुद्धा या गाडीतून प्रवास करत असत. दिल्ली, पंजाब, लाहोर पेशावर अशा प्रवासासाठी तिला ७२ तास लागत आणि जेव्हा बर्फ वितळत असे तेव्हा मधल्या स्टेशनवर नवीन बर्फ भरला जात असे.

विशेष म्हणजे या गाडीतून म.गांधी आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांनीही प्रवास केला होता. ही गाडी कधीच लेट होत नाही अशी तिची ख्याती होती. १९३४ मध्ये ही एसी बोगी असलेली गाडी सुरु होऊन ११ महिने झाल्यावर ती एकदा लेट झाली तेव्हा चालकाला नोटीस बजावली गेली होती. १९३० ते ४० पर्यंत तिला सहा बोग्या होत्या आणि त्यातून ४५० प्रवासी प्रवास करू शकत असत. त्यात फर्स्ट, सेकंड क्लास प्रवाशांना जेवण, वर्तमानपत्रे, पुस्तके, खेळायला पत्ते अशा सुविधा होत्या.

स्वातंत्र्यानंतर आता हीच गाडी मुंबई अमृतसर असा प्रवास करते आहे. १९९६ मध्ये तिचे नाव बदलून गोल्डन टेम्पल मेल असे केले गेले आहे.