स्वतंत्र भारताचे पहिले मतदार नेगी १०४ व्या वर्षी मतदानास सज्ज

स्वतंत्र भारताचे पहिले मतदार अशी ओळख मिळविलेले १०४ वर्षीय शामसरण नेगी पुन्हा एकदा मतदान करण्यास सज्ज झाले असून हिमाचलच्या मंडी येथील लोकसभा पोटनिवडणुकीत ते आज मतदान करत आहेत. जिल्हा प्रशासन किन्नोर तर्फे शाम सरण यांना बूथ नंबर ५१ वर मतदानासाठी नेण्याची पूर्ण तयारी केली असून निवडणूक अधिकारी व एसडीएम कल्पा स्वाती डोगरा म्हणाल्या कि शामसरण यांना त्यांच्या घरापासून मतदान केंद्रापर्यंत सरकारी वाहनाने नेले जाणार आहे. तेथे मतदार बूथवर त्यांचे लाल गालीचा घालून स्वागत केले जात असून स्थानिक पारंपारिक वेशभूषेत त्यांच्या स्वागताला उपस्थित राहत आहेत.

नेगी यांना एका डोळ्याने नीट दिसत नाही,एका कानाने कमी ऐकू येते आणि त्यांचे गुढगे दुखतात. त्यामुळे त्यांना मतदानासाठी आणताना डॉक्टर आणि स्वयंसेवक तैनात केले गेले आहेत. त्यांचा मतदान करण्याचा उत्साह कायम आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाने त्यांना ब्रांड अम्बेसिडर केले होते.

१९५२ मध्ये स्वतंत्र भारताचे पहिले लोकसभा मतदान झाले. पण या भागात बर्फ खूप पडतो म्हणून सप्टेंबर १९५१ मध्येच येथे मतदान घेतले गेले होते. त्यावेळी शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या रामशरण यांना निवडणूक ड्युटी लागली होती. त्यांना या कामासाठी दुसऱ्या गावी जावे लागणर होते तेव्हा आपले मतदान राहून जाऊ नये म्हणून नेगी त्यांच्या कल्पा मतदार संघात सकाळी लवकर गेले. तेव्हा निवडणूक स्टाफ यायचाच होता. सकाळी ६ वा निवडणूक स्टाफ हजर झाल्याबरोब नेगी यांनी त्यांना मतदान करायचे आहे आणि दुसऱ्या गावी निवडणूक मतदान ड्युटी साठी जायचे आहे असे सांगून मतपत्रिका देण्याचा तगादा लावला होता. त्यांना नोंदणी करून मतपत्रिका दिली गेली आणि मतदान झाले तेव्हा त्यांनी स्वतंत्र भारतातील पहिला मतदार होण्याचा इतिहास रचला होता.