यंदा साजरी होणार स्वदेशी दिवाळी, चीनी मालाला ग्राहकांचा नकार

करोना नंतर चीनी मालावर बहिष्कार घालण्याचे आवाहन भारतीय जनतेला केले गेले होते त्याला चांगला प्रतिसाद यंदाच्या वर्षात सुद्धा मिळताना दिसत आहे. देशभरातील बहुसंख्य व्यापाऱ्यांनी यंदा दिवाळी साठी मोठ्या प्रमाणावर आयात केल्या जाणाऱ्या चीनी मालाला फाटा दिला असून यामुळे चीनला यंदा किमान ५० हजार कोटींचे नुकसान सोसावे लागेल असे सांगितले जात आहे. गतवर्षी ग्राहकांनी सुद्धा चीनी मालाकडे पाठ फिरविली होती. यंदा व्यापाऱ्यांनी चीनी माल आयात न करता स्वदेशी मालाचा भरपूर साठा ग्राहकांसाठी उपलब्ध केला आहे असे अखिल भारतीय व्यापारी संघटनेचे म्हणणे आहे.

गेल्या दिवाळीत कोविड मुळे ग्राहक बाजारात फिरकले नव्हते आणि त्यामुळे व्यापाऱ्यांची विक्री घटली होती. यंदा मात्र देशभरात ग्राहक मोठ्या संखेने बाजारात गर्दी करत आहेत आणि त्यामुळे या उत्सव काळात किमान २ लाख कोटींची उलाढाल होण्याचे संकेत मिळत आहेत. गेल्या वर्षी व्यापारी संघाने चीनी मालावर बहिष्कार घालण्याचे आवाहन आयातदार आणि व्यापाऱ्यांना केले होते. यंदाही हा बहिष्कार कायम राहिला आहे. परिणामी फक्त दिवाळीच्या उलादालीचा विचार केला तरी चीनला ५० हजार कोटींचा फटका बसेल असे समजते.

व्यापारी संधाचे अध्यक्ष बी.सी.भारतीया म्हणाले कॅट रिसर्च शाखेच्या रिपोर्ट नुसार वितरणाचा दर्जा असलेल्या २० विभिन्न शहरात केलेल्या सर्व्हेक्षणात असे दिसले कि बहुसंख्य व्यापारी, आयातदार यांनी दिवाळीसाठी लागणारे सामान म्हणजे फटाके, आकाशकंदील, मूर्ती, दिव्याच्या माळा, पणत्या, अन्य वस्तू चीन कडून मागविल्या नाहीत. दरवर्षी राखी ते दिवाळी या काळात ७० हजार कोटींच्या वस्तू चीन मधून आयात केल्या जातात. यंदा राखी उत्सवात चीनला ५ हजार कोटींचे नुकसान झाले आहे तर गणेश उत्सवात ५०० कोटींचे नुकसान झाले आहे.