एका झाडावर घेता येणार वांगी आणि टोमॅटोचे उत्पादन
आयसीएआर म्हणजे भारतीय कृषी संस्थान परिषदेतील संशोधकांनी शेतकरी आणि घरात भाजीपाला करणाऱ्या समस्त वर्गासाठी एक नवी प्रजाती तयार केली आहे. टोमॅटो आणि वांगी यांच्या संकरातून ही नवी प्रजाती तयार झाली असून त्यात एकाच झाडावर वांगी आणि टोमॅटो यांचे उत्पादन घेता येणार आहे. या नव्या प्रजातीला ब्रिमॅटो (ब्रिंजल आणि टोमॅटो) असे नाव दिले गेले आहे.
भाजीपाला पिकविणाऱ्या शेतकऱ्यांना हे वाण उपयुक्त आहेच पण शहरी भागात कमी जागेत घराच्या घरी कुंडीत सुद्धा या दोन भाज्या एकाच झाडावर मिळणार आहेत. तुम्ही कुठल्या जागी, कश्या वातावरणात त्याची लागवड करता त्यानुसार उत्पादन किती मिळणार हे ठरणार आहे. कृषी संस्थानाने त्यांना एका झाडापासून २.३८ किलो टोमॅटो आणि २.६४ किलो वांगी मिळाल्याचे सांगितले आहे. जरुरी प्रमाणे खत, पाणी आणि पुरेसा सूर्यप्रकाश मिळाला कि ६० ते ७० दिवसात उत्पादन तयार होते असे समजते. यात वांग्याच्या झाडावर टोमॅटोचे कलम केले जाते.
यापूर्वी संशोधकांनी बटाटा आणि टोमॅटो त्यांच्या संकरातून पोमॅटो विकसित केले होते. या कलम पद्धतीत बटाटे जमिनी खाली आणि टोमॅटो झाडावर आले होते.