आता मिळवू शकता मास्क्ड आधार कार्ड

आधारकार्ड हा आज महत्वाचा दस्तावेज असून कोणतेही सरकारी काम करताना आधारकार्ड द्यावे लागते. सरकारी योजनांचा लाभ घेताना सुद्धा आधारकार्ड जरुरी आहे. पण ज्या प्रमाणात आधार कार्डची गरज वाढू लागली आहे त्याप्रमाणात बनावट आधारकार्ड बनविणे, फसवणूक प्रकार सुद्धा वाढू लागले आहेत. यामुळे आधारकार्ड या महत्वाच्या दस्तावेजाचा वापर अतिशय काळजीपूर्वक करणे आवश्यक बनले आहे.

या पार्श्वभूमीवर आता मास्क्ड आधारकार्ड बनविणे शक्य आहे. यात सुरवातीचे आठ नंबर लपविलेले असतात. म्हणजे त्या जागी फुल्या असतात आणि शेवटचे चार नंबर दिसतात. असे आधारकार्ड मिळविणे सोपे आहे. युआयडीएआयच्या वेबसाईटवर काही जरुरी माहिती दिली कि हे आधारकार्ड सहज डाऊनलोड करता येते. नेहमीच्या आधारकार्डवर १२ आकडे दिसतात तर मास्क्ड आधारकार्डवर फक्त शेवटचे चार आकडे दिसतात. डाऊनलोड केलेल्या आधारकार्डची कॉपी पासवर्डच्या माध्यमातून सुरक्षित राहते. आधारकार्ड पाहताना हा पासवर्ड लागतो. जन्मतारखेचा पुरावा म्हणून सुद्धा हे वापरता येते.

तूर्त या मास्क्ड आधारकार्डाचा उपयोग सरकारी कल्याण योजना खाली दिले गेलेले कोणतेही लाभ मिळविण्यासाठी करता येत नाही असे समजते.