डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कारर्थींच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेणार – धनंजय मुंडे


मुंबई : डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त पुरस्कारार्थींना एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून मोफत प्रवास करण्याबाबतचा प्रस्ताव गृह विभागास लवकरच सादर करण्यात येईल तसेच पुरस्कारार्थींच्या सर्व मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.

मंत्रालयातील दालनात डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मित्र संघाच्या विविध मागण्यासंदर्भात सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीला सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे, राज्य परिवहन महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या विभाग नियंत्रक यामिनी जोशी यासह राज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मित्र संघाचे अध्यक्ष नरोत्तम चव्हाण, प्रभाकर फुलसुंदर, योगेश वागदे, विलास वंशिक, शंकर खुळे तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त पुरस्कारर्थींच्या मागण्यांबाबत सकारात्मक असून पुरस्कारर्थींनी राज्य परिवहन महामंडळाच्या सर्वसाधारण, निमआराम व आराम गाड्यातून तसेच भाडे तत्त्वावर असलेल्या बसेसमधून मोफत प्रवासास मान्यता देण्याबाबत गृह विभागाला दिवाळीच्या आधी प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. तसेच मानधनाबाबतीत वित्त विभागाला माहिती सादर करून याबाबतीतही सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.