क्रांती रेडकर यांचा एनसीबी प्रकरणी काय संबंध? – संजय राऊत


मुंबई – मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरण गेल्या बराच दिवसांपासून गाजत आहे. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला याप्रकरणी अटक करण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाकडून कालच त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. तर याच दरम्यान या प्रकरणाला काहीसे वेगळे वळण लागले असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. बनावट प्रमाणपत्राद्वारे एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी नोकरी मिळवल्याचा आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. सध्या त्यावरुन वादंग उठले आहे. तसेच, त्यानंतर या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना या प्रकरणाबाबत संवाद साधला.

क्रांती रेडकर यांचा एनसीबी प्रकरणी काय संबंध? असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर बाहेरचे अधिकारी येऊन महाराष्ट्राला बदनाम करत असल्याचा आरोपही आज माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी केला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, क्रांती रेडकर यांचा एनसीबी प्रकरणात काय संबंध? ही लढाई एनसीबी आणि इतर अशी सुरु आहे. मला वाटत नाही क्रांती रेडकर यांच्यावर कोणी व्यक्तीगत टीका केली आहे, मी तरी पाहिले नाही. नक्कीच आता महाराष्ट्रात ईडी, सीबीआय, एनसीबी हे बाहेरचे अधिकारी येऊन आमच्या मराठी लोकांना त्रास देत आहेत.

संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, दिल्लीतून ज्या प्रकारे आक्रमण सुरु आहे. ज्यांच्या मानगुटीवर कारण नसताना बसण्याचा केंद्रीय तपास यंत्रणेचा प्रयत्न होत आहे, खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत, देगलूरमध्ये देखील धाडी पडल्या आहेत, मग अशोकराव मराठी नाहीत का?, पवार यांचे नातेवाईक मराठी नाहीत का? सगळेच मराठी आहेत. प्रश्न सत्य-असत्य लढाईचा आहे.

मुख्यमंत्र्यांना क्रांती रेडकर यांनी लिहिलेल्या पत्राबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, आम्हाला क्रांती रेडकर यांच्या विषयी प्रेम आहे, ती मराठी मुलगी आहे. कोणत्याही प्रकारचा तिच्यावर अन्याय होणार नाही. साहेब जरी नसले तरी उद्धव ठाकरे आहेत. बाळासाहेबांच्या विचारांची ही शिवसेना आहे. ठाकरे सरकार आहे, पवार साहेब आहेत. सगळे व्यवस्थित आहे. कोणावर अन्याय होणार नाही. तर समीर वानखेडे यांच्यावर केल्या जाणाऱ्या आरोपांवर विचारल्यानंतर संजय राऊत यांनी बोलणे टाळले. ते म्हणाले की, गुन्हा महाराष्ट्रात घडला आहे. त्याविषयी मी फार बोलणार नाही, कारण तो सरकारचा विषय आहे.