लाइव्ह शोमध्ये शोएब अख्तरचा अपमान करणाऱ्या अँकरची तात्पुरती हकालपट्टी


लाहोर – सध्या सुरु असलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचा संघ चांगली कामगिरी करत आहे. पण मैदानाबाहेर मोठा गोंधळ सुरू आहे. माजी क्रिकेटर शोएब अख्तर आणि अँकर नौमान नियाज यांच्यात अलीकडेच एका लाइव्ह टीव्ही शोमध्ये झालेल्या भांडणानंतर सरकारी टीव्ही चॅनल पाकिस्तान टीव्हीने मोठी कारवाई केली आहे. चॅनलने चौकशी पूर्ण होईपर्यंत दोघांचे तात्पुरते निलंबन केले आहे, म्हणजेच हे दोघे सध्या कोणत्याही पीटीव्ही शोमध्ये दिसणार नाहीत. असे असले तरी अपमानानंतर शोएब अख्तरने आधीच राजीनामा दिला होता.

जिओ टीव्हीच्या वृत्तानुसार, याबाबत एक निवेदन पीटीव्हीने जारी केले आहे. पीटीव्हीच्या शोमध्ये अख्तर किंवा नौमन नियाज दोघेही तपास पूर्ण होईपर्यंत सहभागी होऊ शकणार नाहीत, असे त्यात नमूद करण्यात आले आहे. या दोघांनाही चौकशी समितीने तूर्तास पदावरून हटवण्याची शिफारस केल्याचे बोलले जात आहे. चौकशी समितीच्या बैठकीत इम्रान खानचे मंत्रीही उपस्थित होते, असे बोलले जात आहे.

नौमन नियाज यांना चौकशी समितीने चौकशीसाठी बोलावले होते. या समितीने शोएब अख्तरलाही बोलावले होते. पण बोलावण्याऐवजी समितीने व्हिडिओ पाहावा, असे सांगून शोएब अख्तरने जाण्यास नकार दिला. अख्तर-नियाजच्या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर शोएबने तात्काळ शो सोडण्याचा निर्णय घेतला.

शोएब अख्तरला सर व्हिव्हियन रिचर्ड्स आणि डेव्हिड गॉवर सारख्या जागतिक क्रिकेट महान व्यक्तींसोबत पीटीव्हीने टी-२० विश्वचषकातील पाकिस्तान क्रिकेट संघाच्या कामगिरीवर चर्चा करण्यासाठी आमंत्रित केले होते. राष्ट्रीय संघात शाहीन आफ्रिदी आणि हारिस रौफच्या वाढीची चर्चा सुरू असताना, अख्तरला अँकर नौमान नियाज यांनी अडवले.

अख्तर व्यत्यय आल्याने नाराज झाला आणि त्याने असंतोष व्यक्त केल्यामुळे, अँकरने त्याला हवे असल्यास शो मधेच सोडण्याची ऑफर दिली. तुम्ही थोडे उद्धट आहात आणि मला हे सांगायचे नाही, पण जर तुम्ही जास्त अतिहुशार असाल तर तुम्ही जाऊ शकता. हे ऑन एअर मी सांगत असल्याचे नियाजने अख्तरला सुनावले. त्यानंतरची ही व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.