आरबीआयच्या गव्हर्नर पदी पुढील तीन वर्षांसाठी शक्तिकांत दास कायम


नवी दिल्ली – आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना केंद्र सरकारने पुढील तीन वर्षांसाठी मुदतवाढ दिली आहे. 10 डिसेंबर, 2021 रोजी त्यांचा कार्यकाळ संपणार आहे. शक्तिकांत दास यांना तीन वर्षांसाठी पुन्हा आरबीआय गव्हर्नर पदावर मुदतवाढ देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे. म्हणजेच 10 डिसेंबर, 2021 नंतर पुढील तीन वर्षांपर्यंत म्हणजेच, डिसेंबर 2024 पर्यंत आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास आरबीआय गव्हर्नर पदावर कायम राहणार आहेत.

शुक्रवारी शक्तिकांत दास यांना केंद्र सरकारने 10 डिसेंबर, 2021 नंतर तीन वर्षांसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर म्हणून कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने याबाबतच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, नियुक्तीबाबत मंत्रिमंडळ समितीने तामिळनाडू कॅडरचे माजी भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी शक्तिकांत दास यांच्या पुनर्नियुक्तीला मंजुरी दिली आहे.

12 डिसेंबर, 2018 पासून त्यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेचे 25 वे गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यांनी आरबीआयमध्ये नियुक्तीपूर्वी 15 व्या वित्त आयोगाचे सदस्य म्हणून काम केले होते. यापूर्वी त्यांनी अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभाग आणि आर्थिक व्यवहार विभागात सचिव म्हणूनही काम केले आहे. 8 केंद्रीय अर्थसंकल्प तयार करण्यात त्यांचा थेट सहभाग होता. गेल्या 38 वर्षात दास यांनी शासनाचा मोठा अनुभव घेतला आहे आणि वित्त, कर आकारणी, उद्योग, पायाभूत सुविधा इत्यादी क्षेत्रांमध्ये राज्य सरकारांमध्ये महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.