नवाब मलिकांनी शेअर केला कॉर्डेलिया क्रूझवरील पार्टीतील व्हिडीओ


मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी कॉर्डेलिया क्रूझ रेव्ह पार्टी प्रकरणामध्ये आज थेट त्या वादग्रस्त क्रूझ पार्टीमधील व्हिडीओच शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला या क्रूझवर एका व्यक्तीसोबत नाचताना दिसत आहे. ही व्यक्ती म्हणजे क्रूझवर ड्रग्ज पार्टी आयोजित करणाऱ्या आयोजकांपैकी एक असणारा काशिफ खान असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्येही नवाब मलिक यांनी काशिफ खान क्रूझवर होता, तर एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंनी त्याला अटक का केली नाही असा प्रश्न उपस्थित केला.

सायंकाळी सहा वाजून २६ मिनिटांनी अनेकजण या क्रूझवरील स्विमिंग पूलच्या आजूबाजूला गाण्यांवर नाचत असताना मलिक यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. यामध्ये हिरव्या रंगाच्या शर्टमधील व्यक्तीही नाचताना दिसत असून ही व्यक्ती रेव्ह पार्टी आयोजित करणाऱ्या फॅशन टिव्हीच्या प्रमुखपदी असणारा काशिफ खान असल्याचे मलिक म्हणाले आहेत. सेक्स रॅकेट, ड्रग्ज प्रकरणे आणि पॉर्नोग्राफीचे उद्योग त्याचा प्रमुख काशिफ खान हा करतो, असा आरोप मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.


भाजपच्या अनेकांशी काशिफ खानचे संबंध आहेत. क्रुझवरील पार्टीच्या आयोजकांपैकी तो एक होता. त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन या पार्टीची आमंत्रणे दिलेली. त्याच्याकडून सेक्स रॅकेटची काम केली जातात, असे मलिक म्हणाले आहेत. काशिफ खान त्या दिवशी क्रुझवर होता. मिळालेल्या एका व्हिडीओमध्ये ६ वाजून २६ मिनिटांनी ही व्यक्ती आपल्या प्रेयसीसोबत डान्स करताना दिसत असल्याचे मलिक म्हणाले. वानखेडेंना मला हाच प्रश्न विचारायचा आहे की हा दाढीवाला कोण आहे? त्याला अटक का झाली नाही? असे प्रश्न नवाब मलिक यांनी गुरुवारी उपस्थित केले.

मुंबईमधील आजच्या पत्रकार परिषदेमध्ये नवाब मलिक हा दाढीवाला व्यक्ती म्हणजेच काशिफ कान हा पॉर्नोग्राफी, ड्रग्ज आणि सेक्स रॅकेट चालवतो. समीर यांचे त्यांच्याशी चांगेल संबंध असल्याचे म्हणाले. त्याचबरोबर पुढे बोलताना, मला काही अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी अनेकदा काशिफ खानशी संबंधित ठिकाणांवर अनेकदा छापे मारले, पण कारवाई करण्यापासून वानखेडेंनी थांबवल्याचे सांगितल्याचे नवाब मलिक म्हणाले. इमानदार अधिकारी असणाऱ्या समीर वानखेडे काशिफ खानला का अटक करत नाहीत? असा प्रश्न मलिक यांनी विचारला आहे.

आधी चार दिवस टीव्हीवर मला धमक्या देण्यात आल्या. न्यायालयात जाण्याच्या धमक्या वानखेडेंच्या कुटुंबियांनी मला दिल्या, पण वानखेडेच न्यायालयामध्ये गेले. परवा एक याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली. मलिक यांना प्रसारमाध्यमांशी बोलण्यापासून रोखण्यात यावे, ट्विटरवर लिहिण्यापासून थांबवावे. हे म्हणजे तुम्ही एखाद्याचा बोलण्याचा अधिकार काढून घेणार का, बोलण्यापासून, लिहिण्यापासून थांबवणे हे स्वातंत्र्य हेरावून घेण्यासारखे असल्याचे नवाब मलिक म्हणाले. तसेच कोणी कोणाची बदनामी करण्याचा प्रयत्न करत असेल, तर वेगवेगळे कायदे आहेत त्याअंतर्गत न्यायालयात जावे, असेही ते म्हणाले.