पार्टीसंदर्भात नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांना काशिफ खान यांनी दिले उत्तर


मुंबई – सध्या राज्यासह देशभरात कॉर्डेलिया क्रूझ आणि त्यावर झालेल्या पार्टीची जोरदार चर्चा होत आहे. त्याचबरोबर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी देखील झाडल्या जात आहेत. एनसीबीने याच पार्टीमधून आर्यन खानला आधी ताब्यात घेत अटक केली होती. पण, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केला असून समीर वानखेडेंचे या पार्टीचे आयोजक काशिफ खान मित्र असल्यामुळेच त्यांना अटक केली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. समीर वानखेडे यांनी हे नवे आरोप फेटाळले असले, तरी यासंदर्भात काशिफ खान यांची भूमिका महत्त्वाची मानली जात होती. अखेर यासंदर्भात काशिफ खान यांनी आपली सविस्तर प्रतिक्रिया दिली असून नवाब मलिक यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. काशिफ खान यांनी एबीपीशी बोलताना आपली भूमिका मांडली आहे.

नवाब मलिक यांच्याकडे अपुरी माहिती आहे. मला वाटते की सर्व चुकीची माहिती त्यांच्याकडे आहे. माझा कोणत्याही ड्रग्जच्या व्यवहाराशी संबंध नाही. साधी सिगारेटही मी ओढत नसल्याचे लोकांना माहित आहे. माझ्यावर करण्यात आलेले आरोप पूर्णपणे निराधार आणि चुकीचे आहेत. ते असे का करत आहेत हेही मला माहिती नाही. त्यांना मी ओळखत नाही, मी त्यांना कधीही भेटलेलो नाही. मला माहिती नाही ते यात मला का ओढत आहेत. पण मला खात्री आहे की त्यांना ज्यांनी कुणी चुकीची माहिती दिली आहे, त्यामुळे त्यांचा गैरसमज झाला असल्याचे काशिफ खान म्हणाले आहेत.

दरम्यान, काशिफ खान यांच्यासोबत असणाऱ्या महिलेजवळ शस्त्र होते, या आरोपावर देखील त्यांनी स्पष्टीकरण दिले. तुम्हाला वाटते कुणीही सीआयएसएफची सुरक्षा पार करून एक साधी टॉय गन देखील घेऊन जाऊ शकते? असे बोलणे मला निरर्थक आणि वेळ वाया घालवणारे आहे. मला वाटत नाही की यावर आपण चर्चा देखील करायला हवी. आणि जर असे घडले, तर लोकांना शोध घेऊ द्या. क्रूझसाठी जी सरकारी सुरक्षा एजन्सी होती, त्यांना विचारा की हे आले कुठून? असे काशिफ खान म्हणाले.

काशिफ खान यांना अटक समीर वानखेडेंचे मित्र असल्यामुळेच करण्यात आली नसल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. त्यावर बोलताना, समीर वानखेडेला मी ओळखत नाही. हे नवाब मलिक का बोलत आहेत? कशासाठी बोलत आहेत? हे त्यांना विचारले पाहिजे. समीर वानखेडेंशी कधीही मैत्री, चर्चा, भेट झालेली नाही. त्यांना मी कधीही भेटलो किंवा बोललेलो नाही, असे ते म्हणाले.

कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांना देखील काशिफ खान यांनी प्रत्युत्तर दिले आहे. हा कार्यक्रम मी आयोजित केला नव्हता. हा कार्यक्रम दिल्लीच्या एका कंपनीने आयोजित केला होता. त्या कंपनीच्या लोकांना आधीच ताब्यात घेण्यात आले आहे. तेथील सर्व गोष्टींसाठी मी माझ्या क्रेडिट कार्डमधून पैसे भरले आहेत. माझ्याकडे सर्व बिले आहेत. मी कुठेही येऊन हे सिद्ध करण्यासाठी तयार असल्याचे म्हणाले.

दरम्यान, एफटीव्हीचा देखील लोगो पार्टीसाठीच्या पोस्टर्समध्ये होता. काशिफ खान हे एफटीव्हीचे संचालक आहेत. यासंदर्भात विचारणा केली असता त्यावर ते म्हणाले, पोस्टरमध्ये दोन नावे होती. एक एफटीव्ही आणि दुसरे जॉनी वॉकर. आयपीएलच्या पोस्टरवर २५ लोकांची नावे असतात. आयपीएलमध्ये काही गोंधळ झाला, तर त्यासाठी हे स्पॉन्सर जबाबदार असतात का?, असा प्रतिसवाल त्यांनी केला.