युवकांनी व्यसनापासून दूर राहण्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन


शिर्डी :- शासकीय निधी आणि योजनेचा योग्य वापर, ग्रामस्थांची साथ आणि लोकसहभागामुळेच हिवरे बाजार गावाचे जागतिक पटलावर कौतुक होत आहे. हा लौकिक टिकवतानाच तरुणांनी व्यसनापासून दूर राहावे असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी हिवरेबाजार येथे केले.

आदर्श गाव हिवरेबाजार येथील विविध उपक्रमांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी गावकर्‍यांशी ग्राम संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समिती अध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, हिवरेबाजारच्या सरपंच विमल ठाणगे, उपवनसंरक्षक सुवर्णा माने याप्रसंगी उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना राज्यपाल म्हणाले, शिकण्याचे कोणतेही वय नसतै त्यामुळे येथील ग्राम विकासाची कामे पाहून मलाही शिकायला मिळाले. गावकऱ्यांनी मेहनतीने कामे केली आहेत त्यामुळे हिवरेबाजार आदर्श गाव झाले आहे. जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घेऊन जिल्हयात अजून आदर्श ग्राम विकसित करावेत अशी सूचना त्यांनी केली. ग्राम संवादाला उपस्थित असलेल्या हिवरेबाजार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना राजभवनवर येण्यासाठी निमंत्रित करतानाच शाळेला पाच लक्ष रुपयांची मदत राज्यपालांनी यावेळी जाहीर केली.

पद्मश्री पोपटराव पवार यांनी प्रास्ताविकात गावामधे राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी पदाधिकारी, गावकरी आणि शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

तत्पूर्वी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे हिवरेबाजार येथील हेलिपॅडवर आगमन झाले. पद्मश्री पोपटराव पवार, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले आणि जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. त्यानंतर गावाजवळील टेकडीवर करण्यात आलेल्या पाणी व्यवस्थापन प्रकल्पाची राज्यपालांनी पाहणी केली.