जामीन मिळाल्यानंतरही आर्यनची आजची रात्र देखील आर्थर रोड जेलमध्येच


मुंबई – १ लाख रुपयांच्या व्यक्तिगत जातमुचलक्यासह अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानची मुंबई उच्च न्यायालयाने सुटका केली आहे. आज मुंबई उच्च न्यायालयाने आर्यनसह अरबाझ मर्चंट आणि मुनमुन धमेचाच्या जामीन अर्जावरील निकालाची प्रत आज जारी केली. प्रत्येकी १ लाखाच्या जामीनावर सुटका करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने निर्देश देत कठोर अटीशर्तीही लागू केल्या आहेत. निकालाची प्रत मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनडीपीएस न्यायालयात सादर होताच न्यायालयाने सुटकेचे आदेश दिले. त्यामुळे या जामिनावर सही करण्यासाठी अभिनेत्री जुही चावला सत्र न्यायालयात पोहोचली आहे आणि तिने सही केली. आर्यनचे वकील सतीश मानेशिंदे यांनी ५ वाजून १० मिनिटांनी सत्र न्यायालयातून आर्थर रोड तुरुंगाच्या दिशेने जामिनाची प्रत घेऊन निघाले. पण, आर्थर रोड जेलची जामीन प्रत स्वीकारण्याची वेळ उलटून गेल्यामुळे आर्यनला आजची रात्र देखील आर्थर तुरुंगात घालवावी लागणार आहे.

आर्यन खानची त्यामुळे जेलमधून सुटका उद्या २७ दिवसांनी आपल्या घरी रवानगी होण्याची शक्यता आहे. सर्वांना नियम समान असून कुणासाठीही वेळेत बदल होणार नसल्याचे आर्थर रोड तुरुंग प्रशासनाने म्हटले आहे. सुटकेसाठी आर्थर रोड कारागृहाबाहेरील जामीन पेटीत रिलीज ऑर्डरची प्रत प्रत्यक्ष टाकावी लागते. यासाठी तुरुंग अधिकारी 5.35 वाजेपर्यंत थांबतात अशी माहिती आर्थर रोड जेल अधीक्षक नितीन वायचल यांनी दिली. शाहरुख खानचे वकील सतीश मानेशिंदे यांनी सांगितले की, आर्यनला लहानपणापासून जुही चावला ओळखते. त्यामुळे जामीनदार म्हणून अभिनेत्री जुही चावला आल्या आहेत. पुढील प्रक्रियेसाठी अजून १ तास तरी लागेल. १४ अटींवर जामीन मंजूर करण्यात आला आहे.