दिनेश कार्तिकच्या पत्नीने दिला जुळ्या मुलांना जन्म


नवी दिल्ली – टीम इंडिया यष्टिरक्षक आणि स्फोटक फलंदाज दिनेश कार्तिक काल वडील झाला आहे. काल त्याची पत्नी दीपिका पल्लिकलने जुळ्या मुलांना जन्म दिला. याबाबतची माहिती दिनेश कार्तिकने सोशल मीडियावरुन दिली. सोबतच आपली पत्नी आणि मुलांसोबतचा फोटो देखील त्याने शेअर केला आहे. दिनेश कार्तिकची पत्नी दीपिका स्क्वॅश प्लेअर आहे.

सोशल मीडियावर जुळ्या मुलांसह त्याचा आणि पत्नी दीपिका पल्लिकलचा फोटो दिनेश कार्तिकने शेअर केला आहे. सोबत त्याचा डॉगी देखील आहे. फोटो शेअर करत त्याने म्हटले आहे की आम्ही तीनचे चार झालो आहोत. आपल्या दोन्ही मुलांची नावे देखील कार्तिकने जाहीर केली आहेत. कार्तिकने एका मुलाचे नाव कबीर पल्लिकल कार्तिक आणि दुसऱ्या मुलाचे नाव जियान पल्लिकल कार्तिक असे ठेवले आहे. दोन्ही मुलांच्या नावानंतर दोघांची आडनावे लावली आहेत. दिनेशने फोटो पोस्ट करताना दोन्ही मुलांचे चेहरे दिसणार नाहीत याची काळजी घेतली आहे.

दिनेश कार्तिक बापमाणूस झाल्यानंतर तो आयपीएलमध्ये खेळत असलेल्या कोलकाता नाइट राइडर्सने ट्विट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. केकेआरने म्हटले आहे की, दिनेश कार्तिक आणि दीपिका पल्लीकल यांना जुळी मुले झाली आहे. आई-वडिल झाल्याबद्दल दोघांना खूप शुभेच्छा. आमचा नाइट राइडर्स परिवार आणखी मोठा झाला आहे. दिनेश कार्तिकची दीपिका पल्लीकल ही दुसरी पत्नी आहे. ती स्वत: स्क्वॅश प्लेअर आहे. पहिल्या पत्नीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर कार्तिकने दीपिकाशी लग्न केले होते.