वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य विभागातील रिक्त पदे भरण्याबाबत कालबद्ध आराखडा तयार करण्याचे अमित देशमुख यांचे निर्देश


मुंबई : वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य विभागातील वर्ग 1 आणि वर्ग 2 ची पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येत असून याबाबत कार्यवाही सुरु आहे. मात्र वर्ग 3 आणि वर्ग 4 ची रिक्त पदे विभागामार्फत भरण्यात येणार असल्याने रिक्त पदे भरण्याबाबतचा कालबद्ध आराखडा दोन्ही विभागामार्फत तयार करण्यात यावा, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण तथा सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिल्या.

मंत्रालयात देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली दोन्ही‍ विभागांच्या रिक्त पदांबाबतचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण आयुक्त वीरेंद्र सिंह, फिल्मिसिटीचे व्यवस्थापकीय संचालक कैलास पगारे, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

देशमुख म्हणाले की, दोन्ही विभागांतील रिक्त पदे पाहता ही रिक्त पदे भरण्याबाबत तातडीने कार्यवाही होणे आवश्यक आहे. रिक्त पदे भरीत असताना ही पदे कशा पद्धतीने भरण्यात येतील याबाबत आराखडा तयार करण्यात यावा. विभाग पदे भरीत असताना परीक्षा घेण्यासाठी कोणत्या संस्थेची निवड कशा पद्धतीने करण्यात येणार आहे, ज्या पदांची भरती करण्यात येणार आहे त्या पदांचे भरती नियम याबाबत सर्व नियोजन करण्यात यावे. तसेच विभागाचा आढावा घेताना पदोन्नती, विभागाचा आकृतीबंध या सगळ्या बाबी तपासून घेण्याचे निर्देशही यावेळी दिले.