काल दिवसभरात 14 हजार 348 कोरोनाबाधितांची नोंद, तर 805 रुग्णांचा मृत्यू


नवी दिल्ली : भलेही देशातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत घसरण होत असली, तरी धोका अद्यापही कायम आहे. सध्याच्या घडीला जरी कोरोनाबाधितांचा दैनंदिन आकडा घटला असला, तरी मृतांचा आकडा अधिक आहे. दरम्यान काल दिवसभरात देशात 14 हजार 348 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 805 बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या 4 लाख 57 हजार 191 वर पोहोचली आहे.

आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात काल दिवसभरात 13 हजार 198 बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. देशात सध्या एक लाख 61 हजार 334 सक्रिय रुग्ण आहेत. तर देशात आतापर्यंत कोरोनाच्या 3 कोटी 42 लाख 46 हजार 157 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 36 लाख 27 हजार 632 बाधित कोरोनामुक्त झाले आहेत.

दरम्यान आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात देशात कोरोना प्रतिबंधक लसीचे 74 लाख 33 हजार 392 डोस देण्यात आले आहेत. त्यानंतर देशात आतापर्यंत 104 कोटी 82 लाख 966 नागरिकांना लस देण्यात आली आहे. आयसीएमआरच्या माहितीनुसार, भारतात कोरोना व्हायरसचे 12 लाख 84 हजार 552 सॅम्पल्स टेस्ट करण्यात आले आहेत. त्यानंतर कालपर्यंत एकूण 60 कोटी 57 लाख 82 हजार 957 सॅम्पल्स टेस्ट करण्यात आले.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत घट होताना दिसत आहे. राज्यातील नागरिकांसाठी ही अतिशय दिलासादायक बातमी आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात राज्यात 1 हजार 418 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर, 36 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्युदर 2.12 टक्के एवढा आहे.

काल दिवसभरात महाराष्ट्रात 1 हजार 428 कोरोनाबाधितांची नोंद झाल्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 66 लाख 7 हजार 954 वर पोहचली आहे. यापैकी 64 लाख 45 हजार 454 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर, 1 लाख 40 हजार 134 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील रिकव्हरी रेट 97. 54 टक्क्यांवर पोहचला आहे. सध्या राज्यात 1 लाख 71 रुग्ण होम क्वारंटाईन आहेत. तर, 896 वैद्यकीय संस्थांमध्ये उपचार घेत आहेत.

लसीकरण कोरोनावर मात करण्यासाठी एकमेव पर्याय असल्याचा तज्ज्ञांचे मत आहे. राज्यात काल दिवसभरात 4 लाख 74 हजार 928 जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 9 कोटी 62 लाख 83 हजार 551 लस देण्यात आल्या आहेत. यात पहिला आणि दुसऱ्या डोसचा समावेश आहे.