ज्वालामुखीच्या उद्रेकाने समुद्रात बुडालेली जहाजे आली पाण्यावर

निसर्ग कोणत्या वेळी, कुठे, कशी आणि काय किमया करू शकतो हे कुणीच सांगू शकत नाही. जपानच्या इवो जिमा बेटाजवळ पॅसिफिक महासागरात झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे दुसऱ्या महायुद्ध काळात बुडविली गेलेली २४ जहाजे समुद्राच्या पाण्यावर आली असून त्यामुळे जगभरात खळबळ माजली आहे. या निमित्ताने इतिहासातील एक रहस्य अचानक समोर आल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात झालेली ही सर्वात चर्चित लढाई असून जपानी मिडिया रिपोर्ट नुसार इवो जिम द्विपाच्या पश्चिम किनाऱ्यावर ही समुद्रात बुडालेली जहाजे वाहात आली आहेत. समुद्रात ज्वालामुखी फुकुतोकू ओकानोवाचा उद्रेक झाल्यावर ही जहाजे पाण्यावर आली आणि किनाऱ्याला लागली.

अमेरिकन सैन्याने इवो जिमा येथे १९४५ मध्ये ही जहाजे बुडविली होती. हा संग्राम दुसऱ्या महायुद्ध काळातील सर्वात रक्तरंजित मानला जातो. ३६ दिवस चाललेल्या या लढाईत ७० हजार अमेरिकन सैनिक सहभागी झाले होते. बेटा ज्वालामुखीखालील खडकाखाली असलेल्या बंकर मध्ये २० हजार जपानी सैनिक लपून बसले होते. या युद्धात जपानचे फक्त २६१ सैनिक जिवंत हाती लागले आणि बाकीचे अमेरिकन सैन्याकडून मारले गेले होते. लढाई नंतर अमेरिकन सैन्याने जाणीवपूर्वक हि जहाजे समुद्रात बुडविली होती.

मिळालेल्या माहितीनुसार गेले दोन तीन महिने या ज्वालामुखीचा उद्रेक होत आहे. कोस्टगार्डकडून मिळालेल्या माहितीनुसार या उद्रेकातून हळू हळू बुडालेली जहाजे वर आली आणि किनाऱ्याला लागली आहेत. या ठिकाणी सी आकाराची अनेक बेटे सुद्धा तयार झाली आहेत.