विप्रोचे अझीम प्रेमजी सर्वात मोठे दानी

आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये विप्रोचे अझीम प्रेमजी यांनी एकूण ९७१३ कोटींचे दान देऊन परमार्थ कार्यात भारतीय नागरिकात अग्रणी बनण्याचा मान मिळविला आहे. प्रेमजी यांनी दिलेल्या दानाचा आकडा पाहिला तर असे लक्षात येते कि या काळात प्रेमजी यांनी सरासरी २७ कोटी रुपये दररोज दान केले आहेत. एडेलविन हुरून इंडिया फीलॉथ्रोफीच्या २०२१ च्या यादीत प्रेमजी दानशूर यादीत प्रथम स्थानी आहेत.

विशेष म्हणजे २०२०-२१ हा काळ करोना प्रभावाचा काल होता. त्यात प्रेमजी यांनी त्यांच्या दानात चौपट वाढ केली असे दिसून आले आहे. या यादीत दोन नंबरवर एचसीसीचे शिव नाडर असून त्यांनी १२६३ कोटींचे दान दिले. आशियातील सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी ५७७ कोटींचे दान करून तिसऱ्या नंबरवर आहेत.

कुमार मंगलम बिर्ला यांनी ३७७ कोटी दान करून चौथे स्थान मिळविले आहे तर इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन निलेकणी यांनी १८३ कोटींचे दान केले आहे. ते या यादीत पाचव्या स्थानी आहेत. देशातील दोन नंबरचे श्रीमंत अदानी ग्रुपचे गौतम अदानी आठव्या स्थानावर आहेत. त्यांनी या काळात १३० कोटी रुपये दान केले आहेत. या यादीत टॉप १० मध्ये हिंदुजा, बजाज, अनिल अग्रवाल, बर्मन परिवार यांचाही समावेश आहे.