भारताच्या २४८ प्राचीन मौल्यवान वस्तू अमेरिकेने केल्या परत

अमेरिकेने गुरुवारी भारताला चोरून अमेरिकेत नेल्या गेलेल्या २४८ प्राचीन मौल्यवान वस्तू परत केल्या असून या प्राचीन कलाकृतींचे अंदाजे मूल्य ११० कोटी (१.५ कोटी डॉलर्स) असल्याचे समजते. या वस्तू मध्ये १२ व्या शतकातील नटराजाची कांस्य प्रतिमा सुद्धा सामील आहे. गेल्या दशकात पाच विविध गुन्हेगारी तपासात या वस्तू मिळाल्या होत्या. मॅनहटन डीस्ट्रीक्ट अॅटर्नी साय वेनस ज्युनिअर म्हणाले या प्राचीन वस्तू प्राचीन आणि आधुनिक भारतातील एखाद्या सांस्कृतिक पुलाप्रमाणे महत्वाच्या आहेत.

भारताचे महावाणिज्यदूत रणधीर जायस्वाल व अमेरिकन होमलँड सिक्युरिटी इंव्हेस्टीगेशन डेप्युटी स्पेशल एजंट इन चार्ज एरिक रोजेनब्लेट यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमात या २४८ वस्तू भारताला परत करण्यात आल्या. या २४८ वस्तू पैकी २३५, सध्या तुरुंगाची हवा खात असलेला आर्टडीलर सुभाष कपूर यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या आहेत. सुभाष कपूर आणि त्याच्या टोळीने भारतातून या वस्तू चोरून मॅनहटन मध्ये आणल्या होत्या आणि मेडिसन अॅव्हेन्यू आर्ट गॅलरी मधून त्यांची विक्री केली होती. या सर्व वस्तू भारताच्या सांस्कृतिक वारश्याची ओळख देणाऱ्या आहेत.