विश्वास नांगरे-पाटलांची समीर वानखेडे लाचखोरी प्रकरणात एन्ट्री


मुंबई – अमलीपदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांची आर्यन खान प्रकरणात लाचखोरीच्या आरोपाबाबत दक्षता पथकाने बुधवारी चार तास चौकशी केल्यानंतर मुंबई पोलिसांनीही या लाचखोरी प्रकरणात मोठे पाऊल उचलले आहे. मुंबई पोलिसांनी समीर वानखेडेंवर झालेल्या आरोपांच्या चौकशीसाठी चार अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. मुंबई पोलिसांचे सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी बुधवारी यासंदर्भातील आदेश जारी केलेत. त्यामुळे आता या आदेशानुसार वानखेडेंवरील आरोपांची मुंबई पोलीस स्वतंत्रपणे चौकशी करणार आहेत.

यासंदर्भात इंडिया टुडेने पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणजेच एसीपी दिलीप सावंत या तपासाचे नेतृत्व करतील. या प्रकरणातील चौकशीसाठी नेमण्यात आलेले अधिकारी हे आझाद मैदान, कुलाबा पोलीस स्थानकातील प्रत्येकी एक तसेच मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकातील एक व अन्य एक अधिकारी सायबर सेलमधील असणार आहे.

आम्ही समीर वानखेडेंविरोधात दाखल करण्यात आलेल्या चारही तक्रारींचा एकत्रितपणे तपास करण्याचे ठरवले आहे. या चारही तक्रारी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस स्थानकामध्ये दाखल करण्यात आल्या असल्याचे अधिकाऱ्यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले. इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसमध्ये कार्यरत असणाऱ्या समीर वानखेडेंविरोधात लाचखोरीच्या चार तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. प्रभाकर साईल, सुधा द्विवेदी, कनिश्क जैन आणि नितीन देखमुख यांनी या तक्रारी दाखल केल्या आहेत.