रिक्षावाल्याबरोबर पळून गेली कोट्याधीश उद्योजकाची पत्नी


एक विचित्र पक्ररण मध्य प्रदेशमधील इंदूर शहरामधून समोर आले आहे. येथील एका कोट्याधीश उद्योजकाची पत्नी रिक्षावाल्याबरोबर पळून गेली आहे. विशेष म्हणजे हा रिक्षावाला या महिलेपेक्षा १३ वर्षांनी लहान आहे. १३ ऑक्टोबर रोजी हा सर्व प्रकार शहरातील खाजराना परिसरामध्ये घडला असून पतीने घटनेच्या दोन आठवड्यानंतर पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यावर यासंदर्भातील खुलासा झाला आहे. कोट्यावधीचा मालक असणाऱ्या उद्योगपतीने पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार केली आहे. पतीने केलेल्या तक्रारीमध्ये ही महिला घरातून पळून जाताना सोबत ४७ लाख रुपये घेऊन गेल्याचेही म्हटले आहे.

या घटनेबाबत समोर आलेल्या माहितीनुसार या महिलेला हा रिक्षावाला कायम घरी सोडायचा. १३ ऑक्टोबर रोजी ही महिला घरीच आली नाही. त्यानंतर या उद्योजकाला त्याच्या घरातील ४७ लाख रुपयांची रोख रक्कमही जागेवर नसल्याचे दिसून आले. तेव्हाच त्याला पत्नी पळून गेल्याची शंका आली. मोठ्याप्रमाणात जमीन या उद्योगपतीकडे असल्यामुळे घरामध्ये तो बरेच पैसे ठेवायचा अशी माहिती समोर येत असल्याचे टाइम्स नाऊने स्थानिक प्रसार माध्यमांच्या हवाल्याने म्हटले आहे. पोलीस या प्रकरणाचा सध्या तपास करत असून या उद्योगपतीची पत्नी आणि रिक्षाचालकाचा ते शोध घेत आहेत.

प्राथमिक तपासामध्ये इम्रान असे रिक्षा चालकाचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. तो ३२ वर्षांचा असून यापूर्वी तो खांडवा, जावरा, उज्जैन आणि रतलाममध्ये राहिला आहे. या सर्व ठिकाणी पोलिसांनी छापेमारी सुरु केली असून या दोघांचा शोध ते घेत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे इम्रानच्या ओळखीच्या लोकांच्या घरी छापेमारी सुरु असतानाच त्याच्या एका मित्राच्या घरी ३३ लाखांची रोकड सापडली आहे.