मुंबई – केंद्रीय मागासवर्गीय आयोगाकडे एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी तक्रार केली आहे. आपल्याला त्रास हा आपण मागासवर्गीय असल्यामुळे दिला जात असल्याची तक्रार समीर वानखेडे यांनी केली आहे. मागासवर्गीय असल्यामुळे आपल्यावर खोटे आरोप केले जात आहेत. समीर वानखेडेंनी नागरी सेवा उत्तीर्ण होताना दाखवलेले जात प्रमाणपत्र हे खरे असून बदनामी करण्यासाठी कटकारस्थान रचले जात असल्याची तक्रार त्यांनी केली आहे.
नवाब मलिकांवर योग्य ती कारवाई करावी, समीर वानखेडे यांची केंद्रीय मागासवर्गीय आयोगाला विनंती
नागरी सेवेदरम्यान आपण सादर केलेली प्रमाणपत्रे ही योग्य असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारची छेडछाड करण्यात आलेली नाही. ज्यावरुन जे आरोप केले जात आहेत, त्यामुळे त्रास होत असल्याची तक्रार समीर वानखेडे यांनी मागासवर्गीय आयोगाकडे दिली आहे. समीर वानखेडे यांनी यासंदर्भात जे खरे आहे ते समोर आणावे आणि योग्य ती कारवाई करावी अशा प्रकारची विनंती केंद्रीय मागासवर्गीय आयोगाकडे केली असल्याचे एबीपी माझाने आपल्या वृत्तात म्हटले आहे.
तर दुसरीकडे समीर वानखेडे यांची बहीण यास्मिन वानखेडे यांनी बुधवारी नवाब मलिक यांच्या विरोधात तक्रार घेऊन राष्ट्रीय महिला आयोगाकडे धाव घेतली. यास्मिनने सांगितले की, मलिक त्यांना ऑनलाइन धमक्या देत आहे. यास्मिन वानखेडे यांनी राष्ट्रीय महिला आयोगाकडे या प्रकरणी तक्रार नोंदवण्याची विनंती केली. त्यांनी आयोगाला यासंदर्भात एक पत्र लिहिले आहे. माझ्यावर नवाब मलिक यांनी अनेक खोटे आरोप केले आहेत. माझ्या भावाच्या प्रामाणिक कर्तव्यात अडथळा आणण्यासाठी नवाब मलिक माझ्या कुटुंबावर आणि माझ्यावर खोटे आणि निराधार आरोप करत आहेत. नवाब मलिक माझ्या सोशल मीडिया हँडलवरून बेकायदेशीरपणे फोटो काढत असल्याचे यास्मिन वानखेडे यांनी म्हटले आहे.