मुझफ्फरनगर – पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद यांना ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) पक्षाचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. भारत पाक सामन्यानंतर टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताविरुद्ध पाकिस्तानचा विजय इस्लामचा विजय असल्याचे वक्तव्य शेख रशीद यांनी केले होते. टी-२० विश्वचषकात भारतीय संघाविरुद्धच्या पहिल्या विजयावर इस्लामचा विजय म्हणून आश्चर्य व्यक्त करत असदुद्दीन ओवेसी यांनी क्रिकेट सामन्याशी इस्लामचा काय संबंध आहे, असा प्रश्न केला. इम्रान सरकारमधील मंत्री शेख रशीद यांना वेडे ठरवून त्यांनी या शेजाऱ्यांना काहीच समजत नसल्याचे म्हटले आहे.
भारताविरुद्ध पाकिस्तानचा विजय इस्लामचा विजय असल्याचे म्हणाऱ्या पाक मंत्र्याला ओवेसींचे सडेतोड प्रत्युत्तर
ओवेसी यांनी ही प्रतिक्रिया उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना दिली आहे. आपल्या शेजारी देशाचा एक मंत्री वेडा आहे. ते पाकिस्तानचा विजय हा इस्लामचा विजय असल्याचे म्हणाले. पण शेजारील देशांना काही कळत नाही. शेवटी इस्लामचा क्रिकेट सामन्यांशी काय संबंध? अल्लाचे आभार माना की आमचे वडील पाकिस्तानाला गेले नाहीत, नाहीतर आम्हाला या वेड्यांना बघावे लागले असते, असे ओवेसी यांनी म्हटले आहे.